पुणे जिल्हा: जुन्याच खड्ड्यात नव्याने वृक्षारोपण?

रामचंद्र सोनवणे

खेड तालुक्‍यातील शासकीय कार्यालयातील केवळ 20 टक्केच झाडे बहरली : यंदा 6 लाख 41 हजार 148 रोपांची होणार लागवड
वनविभाग, सामाजिक वनीकरण वगळता इतर विभागाकडून शासनाच्या आदेशाला हरताळ

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजगुरुनगर – चाकण वनपरिक्षेत्रात वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग वगळता खेड तालुक्‍यातील इतर विभागाच्यावतीने वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत झाडे लावण्यात आली. मात्र, ती झाडे जगविण्यास संबंधीत विभाग अपयशी ठरले आहेत, त्यातील सरासरी 10 ते 20 टक्के झाडेच बहरू शकली. शासकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाच्या भूमिकेमुळे लावण्यात आलेली अनेक झाडे सुकली, याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून दरवर्षी त्याच खड्ड्यात झाडे लावण्यात खेड तालुक्‍यातील काही कार्यालये धन्यता मानत आहेत. शासनाच्या या उपक्रमाला एकप्रकारे हरताळ फासण्याचे काम शासकीय अधिकारी, कर्मचारी करीत आहेत.

दरम्यान, राज्यात 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत खेड तालुक्‍यात यावर्षी 6 लाख 93 हजार 120 झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून प्रत्यक्ष 6 लाख 41 हजार 148 रोपांची लावगड केली जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी चव्हाण यांनी दिली. तर मागील वर्षी तालुक्‍यात 2 लाख 41 हजार 139 झाडे लावण्याचे उद्दिष्ट होते. खेड तालुक्‍यात चाकण आणि खेड, असे दोन वनविभाग आहेत. खेड वनविभागाच्या अंतर्गत 13 कोटी वृक्ष लावगड कार्यक्रमांतर्गत यावर्षी वरची भांबुरवाडी येथे 27 हजार 525 झाडांची लागवड केली जाणार आहे. मागील वर्षी रानमळा येथे 45 हेक्‍टर क्षेत्रात 49 हजार 500 झाडे व जऊळके येथे 11 हजार 10 झाडांची लागवड केली होती. 2016 मध्ये आरुडेवाडी येथील 40 हेक्‍टर क्षेत्रात 49 हजार 400 झाडांची लागवड केली होती. दोन वर्षात वनविभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या झाडांपैकी 72 टक्के झाडे जगली आहे. यावर्षी शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत खेड वनविभागात 60 हजार 555 रोपे लावण्यात येणार आहेत. परंतु, याकरिता खड्डे खोदाईचे नियोजनाबाबत मात्र काहीच माहिती देण्यात आलेली नाही तर, गेल्याच वर्षीच्या खड्यात नवी रापे लावण्याचा प्रकार यावर्षी होण्याची शक्‍यता आहे.

20 विभागाच्या माध्यमातून होणार लागवड
खेड तालुक्‍यातील वनविभाग (3 लाख 26 हजार 175), सामाजिक वनीकरण (1 लाख 57 हजार 172), कृषी विभाग (44 हजार 100), नगरविकास (9 हजार), सार्वजनिक बांधकाम विभाग (13 हजार 500), जलसंपदा विभाग (1 हजार 100), सहकार आणि पणन (800), उद्योग विभाग (12 हजार 320), शैक्षणिक संस्था (3 हजार 50), गृह विभाग (शून्य), आदिवासी विकास विभाग (शून्य), सार्वजनिक आरोग्य विभाग (शून्य), उर्जा विभाग (शून्य), महसूल विभाग (4 हजार), समाज कल्याण व महिला व बालकल्याण विभाग (शून्य), पशुसंवर्धन विभाग (शून्य), ग्रामविकास विभाग (69 हजार 931), अशा जवळपास 20 विभागाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. एक जुलै ते 31 जुलै या काळात तालुक्‍यात 6 लाख 41 हजार 148 विविध झाडांच्या रोपांची प्रत्यक्ष लागवड करण्यात येणार आहे.

फोटोसेशनपूर्तेच वृक्षारोपण…
शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत उपक्रमांतर्गत लावण्यात आलेली झाडे जागविण्याचे काम त्यात्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे असताना आणि ती झाडे जागविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अतर्गत या झाडांचे संगोपन करण्यासाठी निधीची तरतूद केली होती. मात्र त्याचा लाभ घेण्यात आला नाही. वृक्ष लावगड कार्यक्रमांतर्गत शासन झाडे लावण्यासाठी ती जगविण्यासाठी मोठे अनुदान देते मात्र अधिकारी कर्मचारी यांच्या उदासीनतेमुळे दरवर्षी झाडे लावली जातात मात्र ती जगविण्याची जबाबदारी घेतली जात नाही, त्यामुळे केवळ फोटोसेशनपूर्तेच हा कार्यक्रम आतापर्यंत हाती घेतला जातो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

खेड तालुक्‍यात यंदा 6 लाख 41 हजार 148 रोपांची लावगड केली जाणार आहे, त्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वनविभागाच्या माध्यमातून गेली तीन वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली गेली आहे. लावण्यात आलेली रोपे वनकर्मचारी, स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून जगविण्यात आली आहेत. इतर विभागात वृक्ष लागवड कार्यक्रमात लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन झालेले नाही, ही बाब खरी आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याकडे लक्ष देणे गरजेचे होते; त्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत या झाडांचे संगोपन करण्यासाठी निधी आहे. मात्र, त्याचा लाभ कितपत घेतला, हे सांगता येत नाही.
– शुभांगी चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, खेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)