पुणे जिल्हा: चार जणांवर प्राणघातक हल्ला

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

एकाची प्रकृती चिंताजनक
एकूण 11 जणांनी केली मारहाण

लोणी काळभोर -भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली म्हणून 11 जणांनी चौघांना कोयता, तलवार, चाकू, लोखंडी गज, बॅट, स्टंप व पाईपच्या सहाय्याने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असून यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणात राज वलटे (वय 24, रा. पठारेवस्ती), अभिजीत रामदास बडदे (वय 28, रा. अंबिकामाता मंदिर रोड, घोरपडेवस्ती), इनायत हसन खान (वय 17, रा. समता नगर, नुरी मस्जिद मागे) व शुभम जयपाल सिंग (वय 21, रा. पठारेवस्ती) हे चौघे जण जखमी झाले असून यापैकी राज वलटे याचे डोक्‍यात कोयता व तलवारीने वार करण्यात आल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

याप्रकरणी अभिजीत बडदे याने दि दिलेल्या फिर्यादी वरून युवराज माणिक आंबुरे, फिरोज महम्मद शेख, इमरान मोहम्मद शेख, इरफान मोहम्मद शेख, अमन मौलोदिन शेख, राहूल वसंत उघाडे, समिर ऊर्फ मुन्ना सय्यद व गिड्ड्या ऊर्फ मौलोदिन शेख ( सर्व रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती ) या आठ जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांतील युवराज आंबुरे हा सराईत गुन्हेगार आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज सकाळी 10च्या सुमारास इराणीवस्ती नजीकच्या मोकळ्या जागेत सलमान शेरखान पठाण, शुभम सिंग, इनायत खान, शाहरूख सय्यद, बबलू आदी मित्र बसलेले असताना युवराज आंबुरेसह त्याचे सात साथीदार आले. त्यांनी तुम्ही येथे का बसता? असे विचारले व शिवीगाळ करत इनायत खान यास लाथाबुक्‍यांनी बेदम मारहाण केली. यात खान यास हातपाय व पाठीस जबर मुक्कामार लागला. काही वेळाने ते आठजण निघून गेले. खान यास अभिजीत बडदे याने आपल्या मित्राच्या मदतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आणले. परंतू त्याच्यावर उपचार करणे गरजेचे असल्याने पोलिसांनी त्यास ससून रुग्णालयात पाठवले.

त्यानंतर बडदे व सलमान शेरखान पठाण हे दुचाकी (एमएच 12 एनएच 4694) वरून घरी जाण्यासाठी निघाले. दुपारी 12ः45 च्या सुमारास ते लोणी काळभोर गावातील पाषाणकर बाग येथे आले असता अचानक समोरून पाच ते सहा दुचाकींवरून युवराज आंबुरे हा आपल्या साथीदारांसमवेत आला. ते शिवीगाळ करत गाड्यांवरून उतरले. तेव्हा युवराज आंबुरे याचे हातात कोयता, फिरोज शेख याचेकडे तलवार, इमरान शेख याचे हातात पाईप, इफरान शेख याचेकडे लोखंडी गज, अमन शेख याचेकडे स्टंप, राहूल उघाडे याचे हातात बॅट, समिर ऊर्फ मुन्ना सय्यद याचेकडे चाकू व इतर दोन ते तीन अनोळखीचे हातात लोखंडी गज होते. आंबुरे बडदे याचेजवळ आला व तू आमचे विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेला. तुझा माज उतरवतो. आता याला सोडू नका रे असे म्हणत त्याने उलट्या कोयत्याने वार केला. बडदे याने तो उजव्या हातावर झेलला. हा प्रकार पाहून तेथे उभा असलेला बडदे याचा मित्र राज वलटे हा भांडण सोडवण्यासाठी आला. त्यावेळी आंबुरे याने तुू याची बाजू घेतोस. तुला खलास करतो. असे म्हणत धारदार कोयत्याने त्याचेवर वार केला. हा वार डोक्‍यात बसलेने वलटे रक्‍तबंबाळ होवून जमिनीवर कोसळला. त्याचवेळी सर्वजण बडदे व सलमान पठाण यास आपले हातात असलेल्या बॅट, स्टंप, पाईप, लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरूवात केली. तर आंबुरे याने मोठा दगड बडदे याचे दुचाकीवर टाकलेने मोठे नुकसान झाले. ते सर्वजण आपल्या हातातील हत्यारे नाचवत आमचे कोणी नादी लागायचे नाही. म्हणून आरडाओरडा करत होते. सर्वजण आपल्या हातातील हत्यारे नाचवत शिवीगाळ करत दुचाकीवरून निघून गेले. जमलेल्या लोकांनी जखमींना उपचारासाठी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर ससून रुग्णालय पुणे येथे नेले. यामध्ये वलटे याचे डोक्‍यात आठ टाके पडले आहेत. तर बडदे यास गुडघा व हाताला, इनायत खान यास मांडी व छातीस व सिंग याचे पायास जखमा झाल्या आहेत. तसेच चौघांनीही मुक्‍कामार लागलेला आहे. सायंकाळपर्यंत या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडूभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)