पुणे जिल्हा: ऊसतोड मजुराच्या मुलाची कामगिरी

टोमॅटो वाहताना निकाल कळला
आठ जूनला दहावीचा निकाल दुपारी एकला लागला तेव्हा तो अशोक लकडे यांच्या शेतात आईसोबत टोमॅटो तोडत होता. त्याचा मित्र अर्जुन सपकाळ याने फोन करून 91.20 टक्के पडल्याचे सांगितले. यावर सोमनाथला आणि त्याच्या आईलाही आनंदाश्रू आवरले नाहीत. तरीही काम पूर्ण करून चार वाजता निकाल पाहिला.

रोजगार करीत मिळवले दहावीत 91 टक्के : चिमणीच्या उजेडात केला अभ्यास

करंजे – पहाटं तीनला उठून पोरगं ऊस तोडायला यायचं. सकाळी आठला कोपीवर येऊन शिळंपाकं खाऊन शाळेत जायचं. दुपारी शाळेच्या खिचडीवर दिवस काढायचं. कधी कट्टाळा नाही केला. हट्ट नाही केला. उलट रोज रातच्याला चिमणीच्या उजेडात न्हायतर साध्या मोबाईलच्या बॅटरीवर अभ्यास करायचं. तरीबी लई मार्क पडली आता तुमीच पुढचं बघा.. हे बोलताना सुशिला रावसाहेब रंधवे या माऊलीचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सोमेश्‍वर कारखाना (ता. बारामती) येथील ऊसतोडणी कामगारांच्या तळावर सहा बाय सहाच्या पाचटाच्या झोपडीत राहणाऱ्या रावसाहेब व सुशिला रंधवे या स्थलांतरीत ऊसतोड मजूर दांपत्याचा मुलगा सोमनाथ याने दहावीला तब्बल 91.20 टक्के गुण मिळवले आहेत. उसतोड करून, केटरर्सकडे व शेतात मजुरी करूनही तो सोमेश्‍वर विद्यालयात अडीचशे विद्यार्थ्यांमध्ये चौथा आला आहे. कुठल्याही सोयीसुविधा नसताना, डोक्‍यावर कुणाचा हात नसताना “अभ्यासाशिवाय पर्यायच नाही’ हे समजलेल्या सोमनाथचे यश सोयीसुविधांची खैरात करणाऱ्या आणि मुलांना केवळ अभ्यासासाठी वेठीस धरणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरत आहे.

रंधवे दांपत्य डोंगरकिणी (ता. पाटोदा जि. बीड) गावचे. चार एकर जिराईत जमीनही पोटाला घालू शकत नसल्याने सोमेश्‍वर कारखान्यावर ऊसतोडीसाठी स्थलांतरित झाले. या परिसरात शिक्षण चांगले असल्याने कारखान्याच्याच जागेत पाचटाची झोपडी बांधून स्थायिक झाले. त्यांचा थोरला मुलगा सचिन ऊस तोडून, मजूरी करून डिप्लोमा झाला असून पंधरा दिवसांपूर्वीच चाकण येथील कंपनीने निकाल येण्याआधी त्यास कामावर घेतले आहे.

सोमनाथ हा पहिली-दुसरी सोमेश्वरनगर जिल्हा परिषद शाळेत शिकला आणि तिसरी-चौथी पाटोद्याला शिकून पुन्हा पाचवीला सोमेश्‍वर विद्यालयात आला. दहावीचे वर्ष सुरू होण्याआधी उन्हाळी सुट्टीत केटरर्सकडे आणि शेतात काम करून पैसे जमविले. त्या फीमधून दिवाळीपर्यंत खासगी क्‍लासेसही केले. दिवाळीनंतर पहाटे तीनला उठून आई-वडिलांसोबत ऊस तोडायला जायचा. आठला कोपीवर येऊन आंघोळ करून, शिळे खाऊन शाळेत जायचा. पुन्हा दुपारी कोपीवर येऊन गुरांना खाणे-पिणे करून पुन्हा शाळेत जाऊन शालेय पोषण आहार खायचा. रात्री आल्यानंतर कोपीवर रॉकेलच्या चिमणीच्या उजेडात अभ्यास करायचा. अनेकदा ऊसतोडीसाठी शाळा बुडायची. पण परीक्षेआधी शेवटचे दोन महिने त्याने ऊसतोड बंद केली आणि विवेकानंद अभ्यासिकेत जाऊन अभ्यास सुरू केला. रात्री वीजकंपनीच्या कार्यालयाबाहेरील उजेडात अभ्यास केला. शिक्षकांनीही त्याच्यावर लक्ष ठेवले. यामुळे त्याला नववीत 78 टक्के होते पण दहावीला शेवटच्या दोन महिन्यात 91.20 टक्‍क्‍यांपर्यंत त्याने झेप घेत गुणवत्ता सिद्ध केली. “पोरगं लय हुशार हाय. त्याला लय शिकायचंय पण ऐपत उरली नाही’ अशी व्यथा सुशिला यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)