पुणे : जिल्हास्तरीय खेळाडूंना पालिकेचा मदतीचा हात

1 लाख रुपयांचा विमा उतरविणार


कंपन्यांचे दर प्राप्त होताच प्रस्ताव स्थायी समितीसमोर

पुणे : जिल्हास्तरीय पातळीपासून पुढे आंतराष्ट्रीय पातळीपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन शहराचा नाव लौकिक वाढविणाऱ्या खेळाडूंना महापालिकेकडून मदतीचा हात दिला जाणार आहे. या सर्व खेळाडूंचा आरोग्य विमा महापालिका प्रशासनाकडून काढला जाणार असून त्याची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून विमा कंपन्यांना पत्र पाठविण्यात आले असून कंपन्यांचे दर प्राप्त होताच त्या बाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला जाणार आहे. शहरातील 1 लाख खेळाडूंना या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा प्रकारे विमा उतरविणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ही योजना मांडली असून त्यासाठी पालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात (2018-19) निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये शहराचे नावलौकिक वाढविणाऱ्या खेळाडूंना एखाद्या अपघातामध्ये अपंगत्व आल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास संबंधित खेळाडूला तसेच त्याच्या कुटुंबियांना आर्थिक हाल सहन करावे लागतात. त्यामुळे या वर्षापासून शहरातील अशा खेळांडूचा विमा उतरविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

प्रशासनाने शहरातील खेळाडूंची माहिती गोळा करून याचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून पुढील दोन ते तीन आठवड्यात हा विषय मंजुरीसाठी स्थायी समिती समोर येणार आहे. 5 ते 30 वर्षे वयोगटातील खेळाडूंना या विमा योजनेचे कवच मिळणार आहे. विमा योजनेत सहभागी होणारा खेळाडू हा शहराचा रहिवासी असला पाहिजे अशी अट घालण्यात आली आहे. या विम्यात नक्की किती रक्कम दिली जाणार याची चर्चा सुरू असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. या योजनेसाठी अंदाजपत्रकात 25 लाख रुपयांची तरतूद असून या योजनेसाठी आवश्‍यकता भासल्यास आणखी तरतूद उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)