पुणे: जलयुक्‍त शिवाराची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

संग्रहित छायाचित्र

विभागीय आयुक्‍त डॉ. दिपक म्हैसकर यांचे आदेश

पुणे विभागात 27 हजार कामांपैकी 14 हजार कामे पूर्ण

पुणे – पुणे महसूल विभागातील जलयुक्‍त शिवार अभियानात सुरू असलेली सर्व कामे पावसाळ्यापूर्वी व वेळेत पूर्ण करावीत, जेणेकरुन साठलेल्या पाण्याचा लाभ त्या भागातील जनतेला होईल, असे आदेश विभागीय आयुक्‍त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले. सन 2018-19 मधील कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला असून गाव आराखडा तयार करून त्वरीत ग्रामसभेची मंजुरी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील जलयुक्‍त शिवार अभियानातील कामांचा आढावा विभागीय आयुक्‍त कार्यालयात गुरुवारी घेण्यात आला. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, उपायुक्‍त अजित पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटी यांच्यासह विभागातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागात जलयुक्‍त शिवार अभियानात 2017-18मध्ये एकूण 823 गावांची निवड करण्यात आली होती. प्रस्तावित केलेल्या 27 हजार 200 कामांपैकी 14 हजार 211 कामे पूर्ण झाली असून 7 हजार 73 कामे प्रगतीपथावर आहेत. सर्व कामांवर 95 कोटी 45 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

2018-19 साठी जलयुक्‍त शिवार अभियानात पुणे जिल्ह्यात 219 गावे, सातारा 90 गावे, सांगली 92 गावे, सोलापूर 118 आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी 80 गावांची निवड झाली असून या गावांचा आराखडा तयार करून ग्रामसभेची लवकरात लवकर मंजूरी घ्यावी, असे आदेश विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांनी दिले. या कामांसाठी 154 कोटी रुपयांचा निधी उपलबध झाला असून निधीची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीचे प्रास्ताविक पुणे विभागाचे रोजगार हमी योजनेचे उपायुक्‍त अजित पवार यांनी केले. या बैठकीत “मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा आढावा घेण्यात आला. पुणे विभागाला 17 हजार 320 शेततळ्यांचा लक्ष्यांक देण्यात आला होता. त्याकरिता 56 हजार 568 अर्ज प्राप्त झाले होते. 32 हजार 539 शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून 11 हजार 906 कामे पूर्ण तर, 878 कामे चालू आहेत. 11 हजार 707 शेततळ्यांना अनुदान दिले, असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)