पुणे: जमीन फसवणूक प्रकरणातून आणखी दोघांना वगळले

पुणे – माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल जमीन फसवणूक प्रकरणामध्ये आयआरबी कंपनीसह इतर तिघांना खटल्यातून वगळल्यानंतर आता ऍड. अजित बळवंत कुलकर्णी (58, रा. गणेशकृपा सोसायटी, पौड रोड, कोथरूड), ज्यो डेव्हलपमेंट कार्पोरेशनची मालक ज्योती अजित कुलकर्णी (56, रा. गणेशकृपा सोसायटी) यांना न्यायालयाने खटल्यातून वगळले आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश ए. के. पाटील यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

दोघांनी खटल्यातून वगळण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यापूर्वी दत्तात्रय गाडगीळ (62, रा. मैफल अपार्टमेंट, कर्वेनगर), आर्यन इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि.चा संचालक विरेंद्र दत्तात्रय म्हैसकर (46, रा. चांदवली फार्म रस्ता, अंधेरी पूर्व), आर्यन इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपर्स लिमिटेड यांना यापूर्वी खटल्यातून वगळ्यात आले आहे. सर्वांवर डिसेंबर महिन्यात आरोपत्र दाखल करण्यात आले होते. माहिती अधिकार कार्यकर्ता सतीश शेट्टी यांनी 15 ऑक्‍टोंबर 2009 मध्ये आर्यन इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि.चा व्यवस्थापकीय संचालक विरेंद्र म्हैसकर याच्यासह इतर 15 जणांविरोधात लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी पिंपलोळी आणि मावळ तालुक्‍यातील ओझारडे गावातील सरकारी जमीन फसवणूक करून विकत घेतली होती. यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याबाबत शेट्टी यांनी याबाबत फिर्याद दिली होती. पुढे या प्रकरणात वडगाव मावळ येथील न्यायालयात क्‍लोजर रिर्पोर्ट सादर केला होता. 27 डिसेंबर 2012 मध्ये हा क्‍लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला. याच दरम्यानच्या काळात 13 जानेवारी 2010 रोजी सतीश शेट्टी यांची निघृण हत्या झाली. त्यानंतर उच्च न्यायालयाने गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपविला. तसेच जमीन हडप केल्याप्रकरणात समांतर तपास करण्यासाठी सीबीआयने रिटपिटीशन दाखल केले. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा त्वरित तपास करण्याचा आदेश दिला होता. त्या प्रकरणातून आता दोघांना वगळण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)