पुणे – जनजागृतीमध्ये पालिका पडतेय कमी

6 लाख 84 हजार करदात्यांसाठी विमा कंपनीला मोजले 5 कोटी

पुणे – महापालिकेने मिळकतकरदात्या नागरिकांसाठी सुरू केलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेचा लाभ गेल्या एक वर्षामध्ये अवघ्या दहाच कुटुंबांना मिळाला आहे. पालिकेने 6 लाख 84 हजार नागरिकांचा अपघात विमा उतरविला होता. त्यापोटी विमा कंपनीला 5 कोटी रुपयांचा प्रिमीयम भरण्यात आला. मात्र, जनजागृतीअभावी या योजनेची माहितीच बहुतांश नागरिकांना झालेलीच नाही.

मिळकत कर भरणाऱ्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसदाराला विम्यापोटी 5 लाख रुपये मिळत होते. या योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. निवासी मिळकतकर धारकाच्या कुटुंबात तो स्वत:, त्याची पत्नी किंवा पती, त्याच्यावर अवलंबून असलेली 23 वर्षांखालील पहिली दोन अविवाहित अपत्य, मिळकतकर दात्याचे आई व वडील अशांना विम्याची रक्‍कम देण्याची तरतूद आहे. पालिकेच्या 2018-19 च्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी तरतूद करण्यात आली होती. मिळकतकर धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपये, तसेच मिळकतकर धारकाच्या पत्नीचा किंवा पतीचा अपघाती मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये, मिळकतकर धारकावर अवलंबून असलेल्या 23 वर्षांखालील पहिल्या दोन पाल्यास अपघाती मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबाला मूळ विमा रकमेच्या 50 टक्‍के म्हणजे दोन लाख पन्नास हजार रुपये, मिळकत धारकाच्या आई किंवा वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख 50 हजार रुपयांची तरतूद केली आहे.

28 फेब्रुवारी 2018 ते 27 फेब्रुवारी 2019 या कालावधीसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीसमवेत करार करण्यात आला. 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या वर्षाचा निवासी मिळकत कर व गवनी शुल्क भरणाऱ्या करदात्यांना ही योजना लागू करण्यात आली. 28 फेब्रुवारी ते आजअखेर अपघाती मृत्यू, अपघातात पूर्ण अथवा अंशत: अंपगत्व इत्यादी कारणांसाठी योजनेंतर्गत दहा कुटुंबांना लाभ मिळाला आहे. तर उर्वरीत सहा प्रस्तावांची कार्यवाही सुरू आहे. मात्र, लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढविण्यासाठी पालिकेने जनजागृती करण्याची आणि प्रत्येक मिळकतकरदात्यापर्यंत ही माहिती पोहोचविण्याची व्यवस्था करण्याची आवश्‍यकता आहे.

मृत्यू, अपघातांची होते पडताळणी
विमा कंपनीकडून अपघाती मृत्यू अथवा अपघातांची पडताळणी केली जाते. अपघातप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची प्रत, पोलीस पंचनामा, मृत्यू दाखला, कर पावती, वारस कागदपत्रे आदी तपासून विमा योजनेचा लाभ दिला जातो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)