बेकरीसह चार दुकाने खाक : एकाला वाचविण्यात यश
पुणे – घोरपडे पेठेतील चॉंद तारा चौकातील बेकरीसह चार दुकानांना आग लागली. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. मात्र, आगीत चार दुकानांचे जळून नुकसान झाले. जवानांनी तत्परतेने आग आटोक्यात आणून टेलरिंग दुकानात अडकलेल्या दोघांना उपचारासाठी दाखल केले. पण, त्यातील एकाचा रात्री मृत्यू झाला.
मोहम्मद अश्पाक लाडला (वय-21) असे आगीच्या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर, विनोदकुमार स्वराज (वय-31) यांची प्रकृती स्थिर आहे. घोरपडे पेठेतील बेस्ट बेकरीच्या दुमजली इमारतीत बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग इमारतीतील फर्निचर, कुशन वर्क्स, एसी रिपेअरिंग आणि दुसऱ्या मजल्यावरील टेलरिंग दुकानात आग पसरली. कुशन आणि फोममुळे आगीने भीषण रूप धारण केले होते. आग लागल्याची वर्दी मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र तसेच नायडू अग्निशमन केंद्रातील तीन गाड्या तसेच तीन टॅंकरने घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन अधिकारी दत्तात्रय नागलकर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी पाण्याचा मारा करीत 15 मिनिटांत आग अटोक्यात आणली. टेलरिंग दुकानात काही कामगार काम करीत होते, अशी माहिती नागरिकांनी दिल्यानंतर जवान तत्परतेने इमारतीत घुसले. यावेळी दुसऱ्या मजल्यावर टेलरिंगच्या दुकानातील स्वच्छतागृहामध्ये दोघे जण धुरामुळे गुदमरून पडल्याचे त्यांना दिसून आले. जवानांनी त्यांना बाहेर आणत रुग्णालयात दाखल केले. त्यातील मोहम्मद याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.