पुणे – खासगीकरणाचा पहिला ‘डाव’ महागाईला

नवीन वीजजोड महागले 


उद्यापासून तिप्पट दर


वीज नियामक आयोगाचीही मान्यता


 जीएसटीचाही सोसावा लागणार “भार’

– नाना साळुंके

पुणे – महावितरण कंपनीने खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल केली आहे, यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. या खासगीकरणाचा पहिला “डाव’ प्रशासनाने अपेक्षेप्रमाणे महागाईला वाहिला आहे. दि. 1 फेब्रुवारीपासून नव्याने वीजजोड घेणे ग्राहकांना महागात पडणार आहे. सर्व प्रकारच्या ग्राहकांना वीजजोड घेताना आता तिप्पट रक्कम मोजावी लागणार आहे. राज्य वीज नियामक आयोगानेही या “पठाणी दरवाढीला’ मंजुरी दिली आहे. यामुळे ग्राहकांना वीजजोड घेण्यासाठी वीजेच्या खांबापासून पैसे मोजावे लागणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घरगुती, व्यवसायिक, शेतीपंप आणि औद्योगिक ग्राहकांना नव्याने वीजजोड देताना ते त्यांच्या घरापर्यंत अथवा व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत नेऊन देण्याची जबाबदारी महावितरणवर सोपविण्यात आली होती. मात्र, मध्यतंरीच्या काळात प्रशासनाने हा खर्च ग्राहकांवर ढकलला. त्यामुळे ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागत होती. या निर्णयाविरोधात ग्राहक संघटनांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे दाद मागितली होती. त्यावेळी त्यासाठी लागणारी केबल तसेच अन्य खर्च हा महावितरण प्रशासनाने करावा, असे स्पष्ट आदेश आयोगाने दिले. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता.

मात्र, सध्याच्या परिस्थितीत हा अवाजवी खर्च प्रशासनाला परवडणारा नाही, असा कांगावा करण्यात आला होता. या निर्णयाचा पुन:र्विचार व्हावा, असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याशिवाय नव्याने येऊ घातलेल्या भूमीगत वीजवाहिन्यांचा खर्च महागडा असल्याचे महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी आयोगासमोर सादर केले होते. त्यावर झालेल्या सुनावणीत आयोगाने या दरवाढीला मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व प्रकारच्या ग्राहकांना विजेच्या नव्या महागाईला सामोरे जावे लागणार असून ग्राहकांवर “जीएसटी’ चा ही “भार’ पडणार आहे. याबाबतचे परिपत्रक महावितरणने जारी केले आहे.

जुन्या ग्राहकांनाही बसणार भुर्दंड…!
नव्या ग्राहकांना महागाईची झळ बसत असतानाच जुन्या आणि यापूर्वी वीजजोड घेतलेल्या जुन्या ग्राहकांनाही त्याचा जबरदस्त फटका बसणार आहे. यापूर्वी कितीही वर्षांपूर्वी वीजजोड घेतलेल्या ग्राहकांकडूनही नवे शुल्क वसूल करण्यात येणार आहे, संबंधित ग्राहकांनी कितीही अनामत रक्कम भरली आहे त्याची शहानिशा करण्यात येणार आहे. त्यानुसार त्या रकमेत असलेली तफावत त्या ग्राहकांकडून प्रत्येक महिन्याच्या वीजबिलात वसूल करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)