पुणे – खवले मांजर विक्रीच्या तयारीतील तिघे जेरबंद

आठवड्यापूर्वीही दोघांना केली होती अटक

पुणे – भारती विद्यापीठ पोलिसांनी आठवड्यापूर्वी खवले मांजराच्या शरीरावरील खवले विक्री केल्या प्रकरणी दोघांना अटक केली होती. त्यानंतर याच भागात खवले मांजराची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना मंगळवारी पकडण्यात आले. त्यांच्याकडून खवले मांजर हस्तगत करण्यात आले असून ते वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणी योगेश शिवाजी बोंडेकर (रा. वेल्हे), विठ्ठल अंकुश ढगारे (रा. बहिरवाडी, ता. पुरंदर), अरुण सुरेश कुसाळकर (सध्या रा. चिंचवड, मूळ रा. धुळे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर असलेले साथीदार मारुती धनावले, चेतन मिरकुटे हे पसार झाले आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कात्रज भागात काहीजण मोटारीतून खवले मांजर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गस्तीवरील सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चिवडशेट्टी, महेश मंडलिक आणि पथकाने सापळा रचून मोटार थांबविली. मोटारीची पाहणी केली, तेव्हा डिक्‍कीतील पोत्यात खवले मांजर ठेवल्याचे आढळून आले. दरम्यान, गडबडीचा फायदा घेऊन बोंडेकर, ढगारे, कुसाळकर यांच्याबरोबर असलेले दोघेजण पसार झाले.

खवले मांजर बाळगल्यास धनप्राप्ती होते, अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे काहीजण ते विकत घेतात. त्यासाठी मोठी किंमतही मोजली जाते. भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडलेल्या आरोपी आणि साथीदारांनी सातारा जिल्ह्यातील खंडाळा परिसरात हे खवले मांजर पकडले होते. आरोपी खवले मांजर कोणाला विकणार होते, या दृष्टीने तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)