पुणे – क्षयरोग्याची माहिती कळवणे बंधनकारक

पालिका आरोग्य विभागाकडून नोटीफिकेशन जारी


खासगी दवाखाने, वैद्यकीय प्रयोगशाळा, वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश

पुणे – केंद्र सरकारच्या आदेशानुसार क्षयरोग्याची माहिती कळवणे बंधनकारक करण्यात आले असून, केंद्राच्या 16 मार्च 2018 रोजी काढलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या आरोग्यविभागाने हे नोटीफिकेशन काढले आहे.
खासगी आणि सार्वजनिक दवाखाने, रुग्णालये, डॉक्‍टर्स, वैद्यकीय प्रयोगशाळा, केमिस्ट, फार्मासिट ऍन्ड ड्रगिस्ट, वैद्यकीय अधिकारी, अशासकीय संस्थांमार्फत चालवली जाणारी रुग्णालये अथवा दवाखाने यांना हे आदेश देण्यात आले आहेत.

क्षयरोग रुग्णांची माहिती “निक्षय’ (http://nikshay.in/) या संकेतस्थळावर नोंद करायची आहे. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत ही माहिती केंद्र सरकारला कळवण्यात येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आणि क्षयरोग्याची नोंद न केल्यास खासगी, सार्वजनिक रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक यांना कायदेशीर दंड/शिक्षा होऊ शकते.
औषध विक्रेत्यांसाठी “आरोग्य व कुटुंबकल्यान मंत्रालय’ नवी दिल्ली यांनी 30 ऑगस्ट 2013 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार क्षय रोगावरील औषधांचे विक्रीसाठी विहित नमुन्यामध्ये क्षयरुग्णांची माहिती ठेवणे बंधनकारक आहे.

गेल्या 50 वर्षांपासून क्षयरोग नियंत्रणासाठी देशामध्ये सर्वच स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीही दर दीड मिनिटाला एक क्षयरुग्णाचा मृत्यू होतो. तसेच, अंदाजे 10 लाख क्षयरुग्ण दरवर्षी नोंद होत नसल्याने त्यापैकी बरेच क्षयरुग्ण रोगाचे निदान होत नाही. पर्यायाने ते औषधोपचारापासून वंचित आहेत. क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात याविषयीच्या तपासण्या आणि निदान अद्ययावत सुविधा आणि औषधोपचारांसह नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

राज्यात 69 हजार 499 क्षयरुग्णांची नोंद
आजपर्यंत “निक्षय’ सॉफ्टवेअरमार्फत राज्यात 69 हजार 499 क्षयरुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील बरेच खासगी वैद्यकीय क्षेत्रात उपचार घेत आहेत. “निक्षय’ पोषण योजनेंतर्गत नोंदणी झालेल्या क्षयरुग्णांचा उपचार पूर्णपणे बरा होईपर्यंत पोषण आहारासाठी पाचशे रुपये आर्थिक मदत रुग्णाच्या खत्यात जमा केली जाते. ही नोंद करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकालाही पाचशे रुपये मानधन दिले जाते. क्षयरुग्णाने उपचार यशस्वी पूर्ण करून घेतल्यास त्याला पुन्हा एकदा पाचशे रुपये मानधन देण्यात येते.

क्षयरोग हेल्पलाईन
क्षयरोगासंदर्भातील सोयीसुविधा यांची माहिती देण्यासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग हेल्पलाईन सुरू केली आहे. हेल्पलाईन क्रमांक -1800116666 पुणे महापालिका कार्यक्षेत्रात क्षयरुग्ण आढळल्यास dtomhpna@rntcp.org या ई-मेलवर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)