पुणे – कुत्र्याची मालकी नसतानाही कर्मचाऱ्यांवर दंडेलशाही

पुणे – भटक्‍या कुत्र्यांच्या फिरणाऱ्या झुंडी, त्यांची नागरिकांमध्ये असलेली दहशत, त्यांनी घेतलेला चावा, त्यांची असलेली लाखोंची संख्या याचा तर त्रास होतच आहे; परंतु शहरात वावरणाऱ्या “फॅमिली डॉग्ज’चा उपद्रवही वाढला आहे. या “फॅमिली डॉग्ज’ना पकडण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना या कुत्र्यांच्या कथित मालकांचा अरेरावीपणाचा सामना करावा लागत आहे.

शहरातील एकूण कुत्र्यांची संख्या सुमारे साडेतीन लाखांच्या घरात आहे. भटक्‍या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च आणि नसबंदीही केली जाते. मात्र, ती करूनही त्यांची संख्या वाढत असल्याबद्दल अनेक नगरसेवकांनी तक्रारी केल्या आहेत. यावर मुख्यसभेतही बरीच चर्चा झाली आहे. तरीही ही त्यावर प्रभावी उपाययोजना केली गेली नाही, किंबहुना महापालिकेला अजून ती “टॅक्‍ट’ शोधता आली नाही असे म्हणावे लागेल.

रात्री झुंडीने फिरणारी ही कुत्री वाहनचालक, पादचाऱ्यांवर सर्रास हल्ले करतात. त्यामुळे ठराविक भागात दहशतीचे वातावरण निर्माण होते. या प्रश्‍नाबरोबरच आता “फॅमिली डॉग्ज’चाही उपद्रव वाढला आहे. तसेच या डॉग्जचे वालीही बरेच असल्यामुळे महापालिकेचे कर्मचारी त्यांना पकडण्यासाठी आले की, स्थानिकांकडून त्याला विरोध होतो.

“फॅमिली डॉग्ज’ म्हणजे काय?
“फॅमिली डॉग्ज’ म्हणजे हे सोसायटी, दुकान, मंदिर किंवा एखाद्या घराच्या बाहेर सतत राहणारे हे कुत्रे असतात. ते तेवढ्याच भागात फिरत असतात. आजूबाजूचे लोक त्यांना खाऊ-पिऊ घालतात. हे कुत्रे बाहेर भटकून पुन्हा त्याच ठिकाणी आपला निवारा करतात. हा भाग सुरक्षित वाटत असल्याने तेथेच त्यांना पिलेही होतात. तिदेखील तेथेच घरोबा करतात. ओळखीच्या चेहऱ्यांना या कुत्र्यांचा उपद्रव होत नाही. मात्र अन्य जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या अंगावर ही कुत्री भुंकतात, किंवा अंगावर धावून जातात. त्यामुळे या भागातही त्यांची अप्रत्यक्षरित्या दहशतच असते. अशा कुत्र्यांना तेथील लोकच अभय देतात. त्यांच्या नसबंदीसाठी महापालिका कर्मचारी आल्यानंतर हेच लोक कर्मचाऱ्यांवर डाफरतात. गाडीमध्ये पकडलेले कुत्रेही सोडून देण्याला भाग पाडतात. अशा कुत्र्यांची संख्याही सुमारे लाखाच्या घरात आहे.

भूतदया वगैरे ठीक आहे, पण…
काहीजण भूतदया दाखवून अशा कुत्र्यांना बिस्किटे वगैरे खाऊ घालतात. प्रत्यक्षात हे कुत्र्यांचे खाणे नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होऊन अनेक रोगांचा सामना त्यांना करावा लागतो. त्याचा परिणाम साहजिकच मानवी जीवनावरही होतो. कारण कुत्र्यांचे केस गळतात. त्यांच्या अंगावर खरूजसारखा रोग होतो. मात्र या गोष्टींची जागृती नसल्याने आणि केवळ या प्राण्यांना खायला घातल्याने पुण्य मिळते, अशा समजुतीतून अनेकजण त्यांच्यासमोर बिस्किटांचे पुडे रिते करतात.

…तर भरावा लागले दंड
कुत्र्यांना किंवा अन्य प्राण्यांना खाऊ घालायचे असेल तर ते रस्त्यावर किंवा दुसऱ्यांच्या दारात खाऊ घातल्यास सार्वजनिक स्वच्छतेमध्ये बाधा आणण्याचा 500 रुपये दंड पडू शकतो. एवढेच नव्हे तर एखादी व्यक्ती जर अशा “फॅमिली डॉग्ज’ना संरक्षण देत असेल, तर त्या कुत्र्याचे लसीकरण, नसबंदी, त्याचे औषधपाणी या सगळ्या गोष्टींची जबाबदारी त्या संबंधित व्यक्तींवर असणार आहे. त्यांनी त्याची या प्रकारे काळजीही घेणे आवश्‍यक आहे.

अधिकारी म्हणतात…
“प्राणीप्रेम असावे, परंतु त्याविषयीचे कायदेही पाळले गेले पाहिजेत. त्यामुळे अन्य नागरिकांना त्याचा मानसिक अथवा शारीरिक त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. या विषयात सगळ्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. प्राणीप्रेमींना बोलावून त्यांच्याशी संवाद करून, जनजागृतीच्या कामात मदत करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे,’ असे महापालिकेतील एक अधिकाऱ्याने सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)