पुणे : कारागृहाच्या भिंतींनी घेतला मोकळा श्‍वास

अनधिकृत पार्किंग, हातगोड्या हटविल्या 


सुरक्षेच्या कारणास्तव बैठकीत निर्णय

येरवडा – येरवडा कारागृहाच्या सुरक्षेच्या कारणास्तव कारागृहाच्या सीमा भिंतीलगतच्या परिसरातील वाहनांची अनधिकृतपणे केली जाणारी पार्किंग तसेच व्यापारी व इतर प्रश्नासंदर्भात उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली. कारागृहाच्या भिंतीलगतचा परिसर नो पार्किंग झोन करण्यासह विविध उपाययोजना करण्यासंदर्भात यावेळी निर्णय घेण्यात आला. ए. व्ही. येरवडा कारागृह प्रशासन, वाहतूक पोलीस, स्थानिक नागरिक, व्यापारी उपस्थित होते.

येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेसंदर्भात पोलिस व महापालिका प्रशासन यांना वारंवार पत्रव्यवहार करण्यात येत होता. मात्र, त्यावर उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. या महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली.

बैठकीला वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्‍त देवीदास पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक भागवत मिसाळ, कारागृह निरीक्षक ज्ञानेश्वर खरात यांच्यासह स्थानिक नागरिक व्यापारी उपस्थित होते. हा परिसर कारागृहाच्या सुरक्षेच्यादृष्टीने नो पार्किंग झोन करण्यात यावा, तसेच इतर महत्त्वपूर्ण विषयांवर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीत येरवडा पोस्ट ऑफिसच्या ते जेलरोड पोलीस चौकीपर्यंतचा कारागृहाच्या भिंतीलगतचा रस्ता नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

या मार्गावर नो पार्किंग फलक बसविणे, या मार्गादरम्यानचा रोड दुभाजक कारागृहाच्या भिंतीकडे सहा फूट शिफ्ट करणे, लोहगाव मार्गाकडे जाणारा बसस्टॉप, जेल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेच्या फुटपाथवर शिफ्ट करणे, अरोडा पोस्ट चौकात सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करणे, येरवडा पोस्ट ते जेलरोड चौकीदरम्यान असणाऱ्या रस्ता दुभाजकातील चार पंक्‍चरमधील दोन पंक्‍चर बंद करणे, पादचारी मार्गाकरिता झेब्रा पट्टे आखणे तसेच पादचारी मार्गाचे फलक लावणे, तसेच येरवडा कारागृहाच्या भिंतीलगत नागरिक व्यापारी ग्राहकांनी वाहने पार्क करून अथवा कोणताही व्यवसाय करू नये या विषयांवर चर्चा करण्यात आली.
कारागृह विभागाच्या सुरक्षेच्या दृष्टीने वरील उपाययोजना महत्त्वपूर्ण असल्याची माहिती कारागृह निरीक्षक जगताप यांनी दिली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ म्हणाले, कारागृहांची सुरक्षितता ही महत्त्वपूर्ण बाब आहे.

सार्वजनिक रस्ते व फूटपाथ यावर अनधिकृतपणे व्यवसाय करणारे व्यावसायिक यांच्यावर महापालिकेच्या वतीने कारवाई करावी लागू नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी बैठकीत केले. या बैठकीला स्थानिक नागरिक व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून, याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. येरवडा कारागृहाच्या सुरक्षेसह या “नो पार्किंग झोन’मुळे कारागृहाच्या रंगवलेल्या भिंतींनी देखील मोकळा श्वास घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)