पुणे: कर्वेरस्ता उड्डाणपुलासाठी 35 कोटी

टप्प्या टप्प्याने पैसे देणार
महापालिका प्रशासनाकडून या कामाचा खर्च दिला जाणार असला तरी, ही रक्कम महामेट्रोला एकाच वेळी न देता दरवर्षी टप्प्या टप्प्याने दिला जाणार असून त्यासाठी अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतूद केली जाणार आहे. 2018-19 च्या अंदाजपत्रकात या कामासाठी सुमारे 14 कोटी 60 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित केला असून त्यातून पहिल्या वर्षीच्या कामाचा खर्च दिला जाणार आहे. या खर्चात महामेट्रोला महापालिकेकडून या कामासाठी देण्यात येणाऱ्या 4.50 टक्के सुपरव्हीजन चार्जेसचाही समावेश असल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून माहितीचा प्रस्ताव स्थायी समोर : पुढील आठवड्यात चर्चा होण्याची शक्‍यता

पुणे – महामेट्रोकडून कर्वे रस्त्यावर नळस्टॉप चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या कामाचा प्रकल्प आराखडा महामेट्रोकडून तयार करण्यात आला असला तरी त्याचा सर्व खर्च पुणे महापालिकेकडून देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास या पूर्वीच स्थायी समितीने आणि मुख्यसभेने मान्यता दिलेली होती. या पुलासाठी आता 35 कोटींचा खर्च येणार असून त्या खर्चास महापालिकेच्या तांत्रिक छाननी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. हा मान्यतेचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून स्थायी समितीच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत आणण्यात आला होता. मात्र, समितीने तो दाखल करून घेण्यास नकार देत पुढील आठवड्याच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.

कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकात स्वारगेट, म्हात्रेपूल, कर्वेनगर, विधी महाविद्यालय रस्ता तसेच डेक्कनकडून येणारी वाहतूक एकाच ठिकाणी येते. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, या चौकातून महामेट्रोच्या मार्ग क्रमांक 2 वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग जाणार असल्याने महामेट्रोकडून त्या ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित होता. त्यामुळे स्वतंत्र उड्डाणपूल न करता दुमजली उड्डाणपूल करण्यात यावा तसेच त्याचे काम महामेट्रोने करावे आणि त्यासाठी पुणे महापालिकेने खर्च करावा असा निर्णय स्थायी समिती आणि मुख्यसभेने घेतला होता. त्यानुसार, महामेट्रोने या पुलाचे संकल्प चित्र आणि खर्चाचा आराखडा तयार करून महापालिकेस सादर केला होता. त्यानुसार, महामेट्रोचे संकल्पचित्र आणि या पुलाच्या 35 कोटी 25 लाख 13 हजार 236 रुपयांच्या खर्चास महापालिकेच्या तांत्रिक छाननी समितीने मान्यता दिली आहे. हा खर्च महापालिकेकडून मुख्यसभा आणि स्थायी समितीच्या या पूर्वीच्या ठरावानुसार दिला जाणार आहे. त्यामुळे ही बाब स्थायी समितीच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रशासनाने हा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, आयत्यावेळी प्रस्ताव आणल्याचे सांगत, समितीने तो दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे पुढील आठवड्यात या खर्चाबाबत चर्चा होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)