पुणे: कचऱ्यात प्लॅस्टिकचे प्रमाण कमी की जास्त?

संकलन – माधवी काकडे

प्रश्‍नावर कचरावेचकांच्या संमिश्र प्रतिक्रिया : काहींचे 50 टक्‍क्‍यांनी घट; तर काहींचे वाढल्याचे मत

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – महापालिकेने प्लॅस्टिक पिशवी विक्रेत्यांवर कारवाईचे सत्र सुरू केले आहे, वापरावरही निर्बंध आणले. दंडात्मक कारवाई ऐवजी सद्यपरिस्थितीत जप्त करण्याची मोहीम सुरू केली. हे सगळे सुरू असले तरी प्रत्यक्षात कचऱ्यात प्लॅस्टिक न येण्याचा हेतू साध्य झाला का, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याबाबत कचरा वेचकांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली. प्लॅस्टिक वस्तूंचे प्रमाण कमी झाले असे काहींचे म्हणणे आहे तर काहींनी घरातील प्लॅस्टिक पिशव्या आणि अन्य वस्तू आरोग्य कोठींमध्ये जमा न करता थेट कचरा कंटेनरमध्ये आणून टाकल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर महापालिका प्रशासनाने कडक कारवाईला सुरुवात केली. महापालिका हद्दीत कचरा गोळा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर समोर आलेल्या वास्तवानुसार कचऱ्यात येणारे प्लॅस्टिकचे प्रमाण 45 ते 50 टक्‍क्‍याने घटले आहे, असे काहींचे म्हणणे आहे; तर काहींचे ते वाढल्याचे.

प्लॅस्टिक कचऱ्यात प्रामुख्याने कॅरीबॅग, प्लॅस्टिक पॅकिंग, थर्माकोल किंवा प्लॅस्टिकच्या “युज ऍण्ड थ्रो’ वस्तू, मल्टी लेयर्ड पॅकेजिंग मटेरियल, गारबेज बॅग लाइनर्स प्रामुख्याने असतात. कचरा वेचकांकडून कचऱ्यात या प्लॅस्टिकचे प्रमाण किती आहे, याबाबत पाहणी करण्यात आली. तसेच कचऱ्यात या बंदी असलेल्या वस्तूंचे प्रमाण घटले आहे का, नागरिकांकडून प्लॅस्टिक वापरण्यात काही बदल झाला आहे का; तसेच कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे का, याबद्दल माहिती विचारण्यात आली. वेचकांनी पाहणीदरम्यान दिलेल्या माहितीचे संकलन केल्यानंतर सरासरी निम्म्याने प्लॅस्टिक कचरा कमी झाल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. प्लॅस्टिक बंदीमध्ये नसलेले मोठ्या ब्रॅण्डच्या खाद्यपदार्थांच्या पिशव्यांचे प्रमाण कचऱ्यात मोठ्याप्रमाणात आहे. त्यांना कोणतीही बंदी नसल्याने त्या कचऱ्यात फारसा फरक झाला नसल्याचे कचरा वेचकांनी सांगितले.

पॅकेजिंग प्लॅस्टिकमधी कमी
जेवढ्या कचरा वेचकांशी चर्चा केली त्यातून मिळालेल्या माहितीनुसार 60 टक्के कचरा वेचकांनी प्लॅस्टिक बॅगचे कचऱ्यातील प्रमाण कमी झाले असल्याचा दावा केला आहे; तर 18 टक्के वेचकांनी कॅरीबॅगच्या प्रमाणात कुठलाही बदला झाला नसल्याचे सांगितले आहे. उर्वरित 22 टक्के वेचकांनी कॅरीबॅगमध्ये वाढ झाली असल्याचे नमूद केले.

बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या खाद्यपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक कमी झाल्याचा दावा 50 टक्के कचरा वेचकांनी केला आहे. उर्वरित वेचकांनी पूर्वीच्या कचऱ्यात आणि आताच्या काहीच बदल झाला नसल्याचे म्हटले आहे. तर 20 टक्‍क्‍यांनी तो वाढल्याचे नमूद केले आहे. “युज ऍण्ड थ्रो’मध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये चमचे, स्ट्रॉ, प्लेट्‌स आदी वस्तूंचा समावेश आहे. याविषयीही संमिश्र प्रतिक्रिया वेचकांनी व्यक्‍त केल्या आहेत. पार्टी, सणसमारंभ या काळात या वस्तूंचे प्रमाण कचऱ्यामध्ये वाढते असे त्यांचे म्हणणे आहे.

– कार्यालये, आस्थापना, हॉटेलचालक स्वतःहून कंटेनरमध्ये कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून वापरले जाणारे प्लॅस्टिक बॅग वापराचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. – सूरज कसबे, घोले रस्ता कचराडेपो सुपरवायझर

– प्लॅस्टिक बंदीनंतर कचऱ्याचे प्रमाण जवळ जवळ 50% कमी झालेले दिसून येत आहे. – अनिल मोरे, घोले रस्ता कचराडेपो सुपरवायझर

– प्लॅस्टिक बंदी हि चांगली आहे. प्लॅस्टिकचा कचरा वेगळा करताना खूप त्रास होत असे, परंतु आता कचऱ्यात बऱ्याच प्रमाणात प्लॅस्टिक कमी झाले आहे. – राम वाघमारे

– मी 10 वर्षांपासून कचरा वेचण्याचे काम करते; परंतु गेल्या 3-4 दिवसांपासून कचऱ्यात प्लॅस्टिकचे प्रमाण कमी झाले आहे. – सुरेखा लामगे

– कचऱ्यामध्ये येणाऱ्या प्लॅस्टिकचे प्रमाण कमी झाल्याने कचऱ्याचे वर्गीकरण करणे सोपे झाले आहे. – अमर गांगुर्डे

– कॅरी बॅग कचऱ्यात येण्याचे प्रमाण एकदम कमी झाले आहे. – विष्णू वाघुले

– प्लॅस्टिकचे ग्लास, चमचे, स्ट्रॉ यांचे प्रमाण म्हणावे तितके कमी झाले नाही. – मोहसीन शेख

– हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांचे पार्सल देताना प्लॅस्टिक बॅग किंवा प्लॅस्टिक कंटेनरचा वापर कमी केल्याने त्याचे कचऱ्यातील प्रमाण कमी झाले आहे. – अविनाश पवार, कचरावेचक

– आरोग्य कोठ्यांमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या नेऊन देण्याबाबत उदासीनता दिसते. त्या पिशव्या सोसायट्यांच्या कचऱ्यामध्ये येत असल्याचे दिसून येते. – पूजा शिंदे, अजय सातव, कचरावेचक

– कचरा वर्गीकरणावेळी पूर्वी दिसून येत असलेले प्लॅस्टिक बॅगचे प्रमाण कमी झाले नाही. त्याचे प्रमाण तेवढेच आहे. – शंकर चव्हाण, कचरावेचक

– कचऱ्यात प्लॅस्टिकचे प्रमाण कमी झाले आहे. आमच्याकडे प्लॅस्टिकचे चमचे, स्ट्रॉ कमी प्रमाणात आढळून यायला लागले आहेत.- अनिकेत तिरडे, कचरावेचक

– प्लॅस्टिक बंदीवर कडक कारवाई सुरू करून चार दिवस झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत फरक पडल्याचे दिसून येत नाही; प्रत्यक्षात रिझल्ट मिळायला आणखी दोन महिने तरी लागतील. – रोहित गायकवाड, कचरावेचक

– प्लॅस्टिक बंदीवर कारवाई होत असल्याने लोक प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरत नाहीत. त्यामुळे इकडे तिकडे पडलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. – मनिषा पवार, कचरावेचक

– गेल्या चार-पाच दिवसांमध्ये आम्हाला कचरागाडीत प्लॅस्टिक खूप कमी प्रमाणात आढळून येत आहे. – गणेश कुवर, कचरावेचक

– रोज कचरा डेपोमध्ये गाडीतील कचरा डेपोमध्ये टाकताना प्लॅस्टिकचे प्रमाण काहीअंशी कमी झाल्याचे दिसून आले आहे. – भालसिंग सुकाळे

– आम्ही रस्त्याच्याकडेने सफाई करत असताना जे प्लॅस्टिकच्या पिशव्या दिसत होत्या त्यांचे प्रमाण थोडेफार कमी दिसत आहे. – निर्मला गायकवाड, सफाई कर्मचारी

– दंडाच्या भीतीने सार्वजनिक ठिकाणी प्लॅस्टिक वापराचे प्रमाण खूप कमी झाले आहे. – सुनिता मिरासे, सफाई कामगार

– कचरा गोळा करताना प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे प्रमाण जास्त होते. परंतु, प्लॅस्टिकबंदी नंतर ते बऱ्यापैकी कमी झाले आहे. – सुधीर बोराडे, कचरावेचक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)