पुणे: इंधन दरवाढीचे खिशाला चटके

आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार देशातील इंधनाचे दर वाढत असले, तरी आता हे दर वाढतील अशी शक्‍यता सध्या तरी दिसत नाही. कारण, कालपासून आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर हे स्थिर आहेत. त्यामुळे देशातील दरसुद्धा यापुढील काळात फार वाढतील, अशी चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. इंधनावर असणारे काही कर कमी करण्याबाबतसुद्धा गंभीरतेने विचार सुरू आहे.
– अलि दारूवाला, राष्ट्रीय प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशन

पेट्रोल, डिझेलचे भाव उच्चांकी पातळीवर : मध्यमवर्गीय संतप्त
उत्पादन शुल्क कमी करण्याचा केंद्राचा विचार

पुणे – आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दरांत होणाऱ्या वाढीमुळे देशभरात पेट्रोल व डिझेलच्या दराचा भडका उडाला आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांचा निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी पेट्रोल व डिझेलवर लावण्यात आलेले उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. या संदर्भात येत्या एक ते दोन दिवसात निर्णय होईल, असे समजते.

कर्नाटक निवडणूक संपताच गेल्या आठ दिवसांपासून सतत होणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहनचालक त्रस्त झाला आहे. विरोधी पक्षाने तर हा मुद्दा उचलून धरत देशभरात विविध ठीकाणी आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. यामुळे केंद्र सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरूवात केली. हे दर कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, यासंदर्भात मंगळवारी पेट्रोलियममंत्र्यांनी तातडीने इंधन कंपन्यांची बैठक बोलाविली होती. यात इंधन दरवाढीचा अंदाज घेण्यात आला. तेलाचे भाव तत्कालिन सरकारने नियंत्रणमुक्त केल्याने आता आंतरराष्ट्रीय बाजारात ज्याप्रमाणे इंधनाचे दर असतील, त्याप्रमाणात देशात पेट्रोल-डिझेलचे दर ठरविण्यात येतात. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर हे 80 डॉलर प्रति बॅरल गेले आहेत त्यामुळे पेट्रोलचा दर हा 84 रुपयांपर्यत पोहचले.

पुण्यातील आठवडाभरातील इंधनाचे दर (रुपयांत)
दिवस पेट्रोल डिझेल
22 मे 84.54 71.23
21 मे 84.24 70.96
20 मे 83.92 70.71
19 मे 83.59 70.45
18 मे 83.33 70.21
17 मे 83.01 69.90
16 मे 82.80 69.67

हे दर नियंत्रणात आणायचे असतील, तर पेट्रोल-डिझेलवर लावण्यात आलेले निरनिराळे कर जर कमी केले तर इंधनाचे दर कमी होऊ शकतील, असा प्रस्ताव याबैठकीत मांडण्यात आला. मग कुठला कर कमी करता येऊ शकतो, याबाबत सुद्धा विचार झाला. त्यानूसार उत्पादन शुल्क जर कमी केले तर इंधनाचे दर साधारणत: दोन ते अडीच रुपयांनी कमी होतील असा अंदाज आहे.त्यामुळे याबाबतचा एक प्रस्ताव या बैठकीत तयार करण्यात आला असल्याचे समजते त्याचबरोबर हा प्रस्ताव आता पंतप्रधान कार्यालय आणि अर्थमंत्रालयाला तातडीने पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावावर अर्थमंत्रालयाचा अभिप्राय मिळाला की उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही समजते. या प्रक्रियेला साधारणत: दोन ते तीन दिवस लागतील. त्यानंतरच अर्थ मंत्रालयाच्यावतीने याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, यावेळी बैठकीत आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणाऱ्या इंधनाच्या दरावर तेल कंपन्यांनी लक्ष ठेवावे तसेच या चढ-उताराचा अभ्यास करावा, असेही सूचविण्यात आले आहे.

महागाईचा भडका उडण्याची भीती
केंद्रीय पातळीवर तेलाचे दर कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येत असल्यातरी इंधनाचे दर वाढल्याने आता सगळ्याच क्षेत्रात दरवाढ होऊन सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. डिझेलचे दर वाढल्याने सर्वाधिक फटका हा सार्वजनिक वाहतूक सेवेला बसतो. परिणामी, त्यांना दरवाढ करावी लागते. सध्या ही दरवाढ किती करायची याबाबत या वाहतूक संघटनांचा विचार सुरू आहे. येत्या एक ते दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर माल वाहतुकीचे दर सुद्धा वाढणार आहेत. त्याचा परिणाम थेट मालाच्या किमतीवर होणार असून या किंमतीसुद्धा आगामी काळात वाढण्याची शक्‍यता आहे.

इंधन पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणावेत
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घटलेल्या पुरवठ्यामुळे तेलाच्या किंमतींनी प्रतिबॅरल 80 अमेरिकी डॉलरचा टप्पा पार केला आहे. याचा थेट परिणाम भारतासारख्या देशांवर होत आहे. मात्र भारतातील इंधनाचे दर चढे राहण्यात अन्य घटकही कारणीभूत आहेत. उत्पादन शुल्क, मूल्यावर्धित कर (व्हॅट) आदी करांमुळे इंधनाच्या किंमतीत वाढ होते. इंधनावरील उत्पादन शुल्क रद्द केल्यास हे दर आटोक्‍यात येतील. तसेच, इंधनालाही वस्तू व सेवाकराच्या कक्षेत (जीएसटी) आणल्यास ग्राहकांना दरकपातीचा दिलासा मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनदर अशाच प्रमाणात चढे राहिले तर उत्पादन शुल्क व जीएसटीसंबंधी निर्णय घ्यावा लागेल, असे मत व्यक्‍त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)