पुणे – आरटीओ प्रशासनाचे दुर्लक्ष; पीएमपी होतेय आगीचे लक्ष्य

पुणे – शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपीची सरासरी महिन्याला एक बस आगीच्या भक्षस्थानी पडत आहे. गेल्या अडीच वर्षांत तब्बल 22 बसेसनी मार्गावर पेट घेतल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. यात खिळखिळ्या बसेसची संख्या मोठी आहे. असे असतानाही आरटीओ प्रशासनाकडून बसेसची साधी तपासणीही होत नसल्याने प्रशासनाला प्रवाशांच्या जीवाची काळजी आहे की नाही? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

आग लागलेल्या बसेसची संख्या
एप्रिल 2016 ते डिसेंबर 2017 – 13 बसेस


जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 – 8 बसेस


जानेवारी 2019 – 1

पीएमपी ताप्यातील कंत्राटी बसला बुधवारी मार्गावरच आग लागली. आगीचे प्रमाण तीव्र असल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नसली तरी आग लागण्याच्या घटनांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यावर पीएमपी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्या तरी यावर नियंत्रण येत नसल्याचे दिसून येत आहे. ब्रेकडाऊन, अपघात आणि आग लागण्यासारख्या घटनांमुळे सर्वसामान्य प्रवाशाला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीच्या खिळखिळ्या बसेसविरोधात सर्वसामान्य प्रवाशांकडून असंख्य तक्रारी केल्या जातात. मात्र, यावर आरटीओ प्रशासनाकडून कानाडोळा करत बसची तपासणीच केली जात नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

…असंख्य तक्रारी, शून्य कारवाई
खिळखिळ्या बसेसविरोधात सर्वसामान्य प्रवाशांकडून आरटीओ प्रशासनाला मेल, पत्रव्यवहार आदींच्या माध्यमातून असंख्य तक्रारी करण्यात येतात. मात्र, पारदर्शकतेचा टेंभा मिरवणाऱ्या प्रशासनाकडून तक्रारीची साधी दखलही घेतली जात नाही. तर, दुसरीकडे रिक्षा, लक्‍झरी बसेसवर कारवाई करण्यात येते.

कारणे शोधण्यासाठी दुसरी समिती
आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना सुचविण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, तरीदेखील घटना कमी झाल्या नाहीत. यानंतर आता पुन्हा प्रशासनाकडून दुसरी समिती स्थापन करण्यात आली आहे. यात ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) या संस्थेचा समावेश असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)