पुणे -‘आरटीई’ प्रवेशाचे एजंट रडारवर

दलालांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्‍ती

पुणे – “आरटीई’च्या 25 टक्के प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरू असून या धावपळीत पालकांना “मुलाला आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवून देतो’ असे सांगून पैसे उकाळणारे एजंट सक्रीय झाल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे या तक्रारींची दखल गांभीर्याने घेत एजंटच्या मुसक्‍या आवळण्यासाठी शिक्षण विभागाने ठोस पावले उचलली आहेत. एजंटवर करडी नजर ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार “आरटीई’च्या 25 टक्के प्रवेशासाठी पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 16 हजार 594 जागांसाठी तब्बल 49 हजार 600 हून अधिक अर्ज आले आहेत. तर संपूर्ण राज्यातील 1 लाख 16 हजार 772 जागांसाठी तब्बल 2 लाख 20 हजार 207 अर्ज दाखल झाले आहेत. पालकांचा प्रतिसाद लक्षात घेता राज्य शासनाकडून अर्ज भरण्याला पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशप्रक्रिया ही संपूर्ण ऑनलाइन आणि लॉटरी पद्धतीने आहे. परंतु, काही महाशयांनी यामध्ये एजंटगिरी सुरू केली आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्याच्या बहाण्याने किंवा थेट “तुमच्या मुलाला आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवून देतो’ असे सांगून एजंटकडून पैशांची मागणीही केली जाते. त्यावेळी मुलाच्या प्रवेशामुळे हैराण झालेला पालकही “थोडीफार रक्कम देऊन मुलाचा प्रवेश घेऊ’ असा विचार करतो आणि एजंटच्या बळी पडतो. याबाबत शिक्षण विभागाकडे काही तक्रारी आल्या असून, त्याबाबत शहानिशा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, हे एजंट केवळ पैशांसाठी खोटी आश्‍वासने देऊन पालकांकडून पैसे उकळत आहेत, की यामध्ये मोठी साखळी आहे? याची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी यंत्रणा कामाला लावली आहे.

अधिकारी म्हणतात…
आरटीई प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑनलाइन आणि लॉटरी पद्धतीची आहे. त्यामध्ये मानवी हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. तरीही “मुलाला आरटीईअंतर्गत प्रवेश मिळवून देतो’ असे कोणी सांगून पैशांची मागणी करत असल्यास पालकांनी त्वरीत शिक्षण विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. सुनील कुऱ्हाडे यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)