धोकादायक 8 पुलांची तातडीने केली दुरुस्ती
पुणे- मुळा, मुठा नदीवर वाहतुकीसाठी उभारलेल्या 31 पैकी 18 पुलांचे “स्ट्रक्चरल ऑडिट’ पूर्ण करण्यात आले आहे. तर उर्वरित 13 पुलांचे “ऑडिट’ पुढील वर्षभरात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
महापालिकेने 2013-14 मध्ये तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करून सर्वात जुन्या 18 पूलाचे “ऑडिट’ केले होते. त्यातील 8 पूल धोकादायक स्थितीत आढळल्याने प्रशासनाने त्यांची तातडीने दुरूस्ती केली आहे. मुळा-मुठा नदीवर महापालिकेने सुमारे 31 पूल उभारले आहेत. त्यातील काही ब्रिटीशकालीन असूनही सुस्थितीत आहे.
मात्र, या पुलाच्या खालील बाजूस झुडपे उगवणे, पुलाच्या रस्त्याखालील जलवाहिनीस गळती असल्याने या पाण्यामुळे पुलाचा खालील भाग कमकूवत होणे, पुलाच्या भिंतीना ऊन, वारा तसेच पावसामुळे तडे जाणे असे प्रकार घडतात. त्यामुळे पुलांवरील वाहतुकीस धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून 2013-14 मध्ये सर्वाधिक वयोमान असलेलेल्या 18 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते.
त्यात 8 पुलांची दुरूस्ती करण्यात आली आहे. यामध्ये डेंगळेपूल, वेल्सली पूल, शिवाजी पूल, महर्षि शिंदे पूल, संभाजी पूल, म्हात्रे पूल, बंडगार्डन पूल यांचा समावेश आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यात प्रशासनाकडून उर्वरित 13 पुलांचे “स्ट्रक्चरल ऑडिट’ केले जाणार असून त्यास स्थायी समितीनेही मान्यता दिली आहे. त्याचे कार्यादेश लवकरचदेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा