पुणे – आठ आदिवासी आश्रमशाळा बंद होणार

विद्यार्थी संख्या कमी असल्याचे कारण 


पुणे जिल्ह्यातील कुरुंजी, पांगरी येथील दोन आश्रमशाळांचाही समावेश

पुणे – विद्यार्थी संख्या कमी असलेल्या राज्यातील आठ शासकीय आदिवासी आश्रमशाळा पुढील शैक्षणिक वर्षांपासून बंद करण्यात येणार आहेत. यात पुणे जिल्ह्यातील कुरुंजी, पांगरी येथील दोन आश्रमशाळांचाही समावेश आहे.

आदिवासी विकास विभागाच्या धोरणानुसार आश्रमशाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थी क्षमता ही 50 इतकी निश्‍चित करण्यात आली आहे. यात 40 निवासी व 10 बहिस्त विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येतो. यातही निवासी विद्यार्थी म्हणून केवळ आदिवासी विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याचे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. बहिस्त विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधाण्याने प्रवेश देण्यात येतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील भागात आदिवासी जमातीची लोकवस्ती फारच कमी आहे. या भागातील आठ आश्रमशाळांमध्ये निवासी आदिवासी विद्यार्थी उपलब्ध होत नाही. परिणामी, निवासी आदिवासी विद्यार्थी क्षमता पूर्णपणे भरली जात नाही. यावरून आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या निवासी विद्यार्थ्यांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी असल्याने उर्वरित सर्व विद्यार्थी बिगर आदिवासी आहेत.

पुणे जिल्ह्यातील कुरुंजी, पांगरी, सातारा जिल्ह्यातील बामणोली, गोगवे, कोल्हापूरमधील कोते, बोरवेट, रत्नागिरीतील कादवण, वेरळ या ठिकाणच्या शासकीय आश्रमशाळा सन 2019-20 या शैक्षणिक वर्षांपासून बंद करण्यास शासनाच्या आदिवासी विभागाने मान्याता दिली असून त्याबाबतचे आदेशही उपसचिव ल. गो. ढोके यांनी जारी केले आहेत. या बंद होणाऱ्या आश्रमशाळांमधील कायम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग इतर आश्रमशाळांमध्ये समायोजित करण्यात येणार आहेत. बंद होणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या इतर आश्रमशाळेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी पालकांचे प्रबोधन करण्याबरोबरच त्यांना सर्व मदत करण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित प्रकल्प कार्यालयावर राहणार आहे.

बंद होणाऱ्या आश्रमशाळांच्या शासकीय मालकीच्या इमारतींचा वापर आदिवासी विकास विभागाने अन्य प्रयोजनासाठी करावा अथवा या इमारती अन्य शासकीय प्रयोजनार्थ वापर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करणे बाबतचा निर्णय आदिवासी विकास आयुक्‍तांनी संबंधित प्रकल्प अधिकारी व बांधकाम व्यवस्थापन कक्ष यांच्याशी समन्वय साधून घ्यावा, असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)