पुणे : आकाशचिन्ह विभागाचे विक्रेंद्रीकरण

सक्षम कारवाई, प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्णय

पुणे – महापालिका आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे विक्रेंद्रीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या विभागाचे कामकाज अधिक सक्षमपणे व्हावे तसेच वसुली नियमतपणे व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, यापुढे परिमंडळ कार्यालयांची जबाबदारी असलेले सह महापालिका आयुक्त आणि क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज सांभाळणारे महापालिका सहायक आयुक्त यांच्याकडे असणार आहेत. पालिकेने शहरात 2 हजार अधिकृत फलकांना मान्यता दिली आहे.

आकाशचिन्ह आणि परवाना विभागाच्या माध्यमातून जाहिरात फलकांना मान्यता देणे, मशिनरी परमिट, साठा परवाना परवानगी व नूतनीकरण तसेच हे दिलेले परवाने रद्द करण्याचे काम केले जाते. त्यासाठी आकाशचिन्ह विभागाकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर निरीक्षकांची नेमणूक केलेली आहे. ते क्षेत्रीय कार्यालय स्तरावरूनच ही कामे पार पाडतात. तर मुख्य विभागाकडून नवीन जाहिरात फलकांना परवाना देणे, परवाना नूतनीकरण तसेच अनधिकृत फलकांवर कारवाई केली जाते.

मात्र, ही सर्व कामे पुन्हा या विभागाकडून क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातूनच केली जातात. त्यातच उच्च न्यायालय तसेच राज्यशासनाने 2014 मध्येच अनधिकृत जाहिरात फलक कारवाई निश्‍चित करताना महापालिका सहायक आयुक्त (क्षेत्रीय अधिकारी) प्राधिकृत अधिकारी म्हणून घोषित केले आहे. असे असतानाही, गेल्या चार वर्षांपासून हे काम मुख्य विभागच करत आहे. त्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आपल्या अधिकारात या विभागाचे विक्रेंदीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी 1 मेपासून करण्याचे आदेश काढले होते. त्यासुमार सर्व क्षेत्रीय कार्यालयांना ही माहिती कळविण्यात आली आहे.

मुख्य खाते ठेवणार देखरेख
अधिकारांचे विक्रेंद्रीकरण करताना, आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडे केवळ धोरणात्मक निर्णय तसेच या क्षेत्रीय कार्यालयांच्या समन्वयाची जबादारी ठेवण्यात आली आहे. त्यासाठी आवश्‍यक सेवक वर्ग ठेऊन इतर सर्व सेवक क्षेत्रीय कार्यालयांकडे हस्तांतरित करण्यात यावे, असे या आदेशात म्हटले आहे. या विभागाने आपल्याकडे असलेले सर्व रेकॉर्ड क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीनुसार, संबधित कार्यालयांना 1 मे पूर्वी पाठवावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)