पुणे – आंदोलनाचा परिणाम, एसटीला प्रवासी मिळेनात

– आंदोलनाची भीती : प्रवाशांअभावी मुंबईकडे जाणाऱ्या 40 टक्के फेऱ्या रद्द

पुणे – राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. यात संतप्त जमावाने एसटी बसेसची तोडफोड करत काही बसेस पेटविल्या. या प्रकारांचा धसका घेत प्रवाशांनी सध्या घराबाहेर पडणेदेखील टाळले आहे. परिणामी, बुधवारी स्वारगेट आगारातून मुंबईकडे जाणाऱ्या बसेस सुरू असूनही प्रवाशांअभावी जवळपास 40 टक्के फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. याचा थेट फटका महसुलाला बसत आहे.

-Ads-

राज्यभरातील अनेक जिल्ह्यांत आंदोलनाला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी बसेस जाळण्यात आल्या. सोमवारी चाकण येथेही अनेक बसेस जाळण्यात आल्या. यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना शक्‍य तेथे सुरक्षित ठिकाणी उतरून दिले. यामुळे यातील काहीजण कसेबसे आपल्या घरी पोहचले. मात्र, मनात भीती बसल्याने आणि जाळपोळीची परिस्थीती पाहून आता पुढील काही दिवस प्रवासही नको, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
दुसऱ्या बाजूला गेल्या तीन दिवसांपासून नाशिक मार्गावरील एसटी वाहतूक बंद आहे. तर, काही ठिकाणची वाहतूक सुरळीत आहे. बुधवारी सकाळपासूनच स्वारगेट आगारातून मुंबईच्या दिशेने सुरळीत बसेस सुरू होत्या. यानुसार बोरिवली, ठाणे, पनवेल आदी भागात बसेस सुरू होत्या. मात्र, प्रवासीच मिळत नसल्याने अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. स्वारगेट आगारातून बुधवारी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जवळपास 40 टक्के फेऱ्या रद्द करण्याची वेळ आल्याचे स्वारगेट आगारातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
———————-
– नाशिक, नगर औरंगाबाद सेवा बंदच

चाकण येथील आंदोलनामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मंगळवारनंतर बुधवारीही या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. बुधवारी शिवाजीनगर आगारातून नगर, औरंगाबाद, जुन्नर, शिरूर, भीमाशंकर मार्गावर दिवसभरात एसटीची एकही गाडी मार्गस्थ झाली नाही. तर शिवाजीनगर येथून नाशिककडे जाणारी शिवशाही, निमआराम व साध्या गाड्या सलग तीन दिवसांपासून सुटल्याच नसून दोन्ही शहरातील अनेक नागरिक पुणे किंवा नाशिक येथे पोहोचू शकलेले नाहीत. दरम्यान, इतर मार्गावरील एसटी वाहतूक सुरळीत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
———————

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)