पुणे – अवघड-सोप्या क्षेत्रातील शाळांचा अद्याप सर्वेच नाही?

पुणे – जिल्ह्यातील शाळांची पाहणी करून ज्या शाळा अवघड क्षेत्रातून सोप्या क्षेत्रात येतात त्याच्या नोंदी बदलण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष समिती स्थापन करण्यात आली. त्यानुसार शाळांचे सर्वेक्षण सुरू असून, लवकरच नवीन यादी तयार करण्यात येणार आहे, असे अश्‍वासन देऊन अनेक महिने झाले तरीही अद्याप अवघड-सोप्या क्षेत्रातील शाळांची यादी तयार झाली नाही. यादी सोडा सर्वेक्षणच झाले की नाही याबाबत शंका आहे.

जिल्ह्यात 3 हजार 600 हून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यामध्ये अवघड क्षेत्रातील आणि सोप्या क्षेत्रातील शाळा अशा दोन नोंदी आहेत. त्यामध्ये 934 शाळा अवघड क्षेत्रात आहेत. अवघड क्षेत्र म्हणजे दुर्गम किंवा डोंगराळ भागात तसेच तालुक्‍याच्या ठिकाणाहून लांब किंवा दळणवळणाची सुविधा नाही, अशा शाळांचा समावेश अवघड क्षेत्रात होतो. त्यामुळे बदलीवेळी शिक्षक मंडळी अशा अवघड क्षेत्रात जाण्यास टाळाटाळ करतात. तर काही शिक्षक हे आनंदाने अवघड क्षेत्रात जाऊन ज्ञानदान करतात. दरम्यान, पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे काही शाळा बंद झाल्या. मात्र, दुर्गम किंवा डोंगरभागात असलेल्या शाळा बंद केल्यानंतर विद्यार्थ्यांचे हाल होऊन मुले शिक्षणापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे सध्या काही शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात काही शाळांपर्यंत रस्ते पोहोचले, दळणवळणाच्या सुविधा सुरू झाल्या, तरीही त्या शाळा अवघड क्षेत्रामध्ये गणल्या जात आहेत. शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळांची पाहणी होते. त्यामध्ये अवघड क्षेत्रातील शाळा या सोप्या क्षेत्रात येत असल्याचे अधिकाऱ्यांना माहिती आहे. मात्र, या बदलाबाबत नियमावलीच नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. त्याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळा तपासणीसाठी समिती स्थापन केली. त्यामध्ये अवघड क्षेत्रातील शाळा अशी नोंद असलेल्या शाळा सोप्या क्षेत्रात येत असतील तर त्याचा नोंदी बदलाव्या असे आदेश त्यांनी दिले आहेत. मात्र, शाळा तपासणीचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यातच लोकसभा निवडणुकांमुळे अधिकारी आणि कर्मचारीही निवडणुकीच्या कामात अडकले. त्यामुळे यावर्षीही अवघड आणि सोपे क्षेत्राच्या नोंद बदलणार नाही हे नक्की समजले तर गैर ठरणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)