पुणे : अरेच्चा! शहरातील भूजलसाठा तपासणीची यंत्रणाच नाही

गायत्री वाजपेयी 

समन्वयाचा अभाव 


पाणीसाठ्यांच्या पुनरुज्जीवनात मोठी अडचण

पुणे – शहरात पाण्याची टंचाईची शक्‍यता असताना, शहरी भागातील भूजल पातळीबाबत नोंद केली जात नसल्याचे समोर आले आहे. शहरांतर्गत भूजल तपासणीबाबत यंत्रणाच नसल्याचे यामधून उघडकीस आले आहे. इतकेच नव्हे, तर या तपासणीबाबत महापालिका आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने शहरी भागातील भूजलाची नोंद उपलब्धच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

धरणांतील पाण्यानंतर पर्याय म्हणून भूजल साठ्यावर अवलंबून राहवे लागते. शहरातील पाण्याची मागणी काही प्रमाणात पूर्ण होण्यास यातून बरीच मदत होते. मात्र, शहरात भूजलचे नेमके प्रमाण किती? याची नोंद घेणारी यंत्रणाच उपलब्ध नाही. शहरातील नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन व्हावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने होत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर शहरात नैसर्गिक जलस्रोत तसेच भूजलसाठा किती आहे? याबाबत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरी भागातील भूजल तसेच जलस्रोतांची माहितीच उपलब्ध नसल्याने अशा पाणीसाठ्यांच्या पुनरुज्जीवनात मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शहरातील उपलब्ध भूजल साठा किती? आणि त्याचा वापर कसा करावा, याबाबत स्पष्टता मिळत नसल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

महापालिकेतर्फे शहरातील जमिनीखाली असणाऱ्या पाण्याबाबत कोणतेही सर्वेक्षण केले जात नाही. विविध भागातील पाण्याचे नमुन्यांची खाजगी प्रयोगशाळेमध्ये तपासणी होते. तसेच पाण्याच्या आवश्‍यकतेबाबत भूजल विभागाकडून माहिती घेतली जाते. त्यामुळे शहरांतर्गत भूजल तपासणीसाठी वेगळी यंत्रणा सध्या महापालिकेकडे उपलब्ध नाही.
– व्ही.जी. कुलकर्णी, विभागप्रमुख, पाणीपुरवठा, मनपा


भूजल सर्वेक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील ग्रामीण भागतील भूजल साठ्याची नोंदणी केली जाते. शहरी भागातील भूजल नोंदणी हा महापालिकेच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे विभागाकडून याबाबत कोणतेही सर्वेक्षण केले जात नाही.
– शेखर गायकवाड, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा.


एकेकाळी शहरात नैसर्गिक पाण्याचे अनेक स्रोत उपलब्ध होते. त्यामुळे नागरिकांना पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असत. मात्र गेल्या काही काळात भूगर्भातील पाणी ज्यातून बाहेर पडते, असे नैसर्गिक जलस्रोत बंद करण्यात आले आहेत. विविध विकास काम, नदीचे चॅनलायझेशन या सर्वांचा परिणाम होऊन भूर्गभातील प्रवाह दाबला गेला आहे. त्यातच सिमेंट रत्यांमुळे जमिनीत पाणी मुरत नाही. अशा परिस्थितीत भूजलसाठ्याबाबत नेमकी परिस्थिती काय, सांगणे कठीण आहे. साहजिकच याचा परिणाम नदीवर आणि परिणामी, सर्वसामान्यांच्या जीवनात दिसून येत आहे.
– शैलजा देशपांडे, सदस्य, जीवितनदी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)