पुणे – अभियांत्रिकी पदवी? नको रे बाबा!

‘एमएचटी-सीईटी’ : गतवर्षीपेक्षा 75 हजार अर्ज कमी

– व्यंकटेश भोळा

पुणे – इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर अभ्यासक्रमाच्या पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्‍यक असलेल्या “एमएचटी-सीईटी’साठी नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मुदत शनिवारी संपली. यंदा सीईटीसाठी गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 75 हजारांहून अधिक कमी अर्ज आल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही रोजगाराची संधी उपलब्ध नसल्याच्या कारणावरून यंदा अर्ज कमी असल्याचे दिसून येत आहे.

राज्य सीईटी सेलमार्फत इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर या अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी “एमएचटी-सीईटी’ ही परीक्षा देणे बंधनकारक आहे. सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही स्तरावर प्रवेश दिला जात नाही. एवढेच नव्हे, तर शेवटच्या टप्प्यात संस्थास्तरावर होणाऱ्या प्रवेशाच्या वेळी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. भलेही सीईटीत शून्य गुण मिळो, पण सीईटी देणे अनिवार्य आहे. त्यामुळे सीईटीला महत्त्व आहे.

बारावी परीक्षा दिलेले अथवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या सीईटीसाठी पात्र आहेत. आजअखेर सीईटीसाठी 3 लाख 61 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, त्यातील 3 लाख 45 हजार विद्यार्थ्यांनी पूर्णपणे अर्ज भरले आहेत. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत पूर्ण होत असली, तरी विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत दि. 31 मार्चपर्यंत आहे. त्यामुळे अर्जाची संख्या काही प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे.

गतवर्षी अभियांत्रिकी, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर प्रवेशासाठी 4 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यंदा मात्र ही संख्या सद्यस्थितीत 3 लाख 45 हजार आहे. मात्र, त्यानंतरही गतवर्षीचा विचार करता तब्बल 75 हजारांहून अधिक अर्जाची संख्या यंदा कमी आहे. या अभ्यासक्रमांची पदवी घेऊन नोकरीची तितकीही शाश्‍वती नसल्याने अर्जाची संख्या कमी झाले आहे. विद्यार्थ्यांचा रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाकडे कल वाढत असल्याने अर्जाची संख्या कमी असावी, असे तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

शून्य गुण असतील, तरीही अभियांत्रिकी प्रवेश
तीनही अभ्यासक्रमापैकी गतवर्षी फार्मसी प्रवेश फुल्ल झाले आहेत. तर अभियांत्रिकीची सुमारे 50 हजारांहून अधिक रिक्‍त प्रवेश रिक्‍त राहिले आहेत. यंदाही तिच स्थिती येणार असल्याची चिन्हे आहेत. सीईटीत शून्य गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना इंजिअरिंगला प्रवेश दिला जातो. यावरून इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची स्थिती लक्षात येते. त्यामुळे आता उच्च तंत्र शिक्षणातील प्रवेशाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होत असल्याचे अधोरेखित होत आहे.

4 लाख 28 हजार
गतवर्षीचे अर्ज


3 लाख 45 हजार
यंदा आलेले अर्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)