पुणे: अभियांत्रिकीच्या तात्पुरता प्रवेशासाठी दहा टक्‍केच शुल्क

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात तात्पुरता प्रवेश देत असताना यापूर्वी दहा टक्‍के शुल्क घेतली जात नाही. येत्या शैक्षणिक वर्षात ही सवलत कायम राहणार आहे. प्रवेश कायम न झाल्यास भरलेले 10 टक्‍के शुल्कही विद्यार्थ्यांना शिक्षणसंस्थांनी देणे आवश्‍यक आहे. त्यासंबंधीची सूचना सर्व अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांना दिल्या आहेत. – डॉ. अशोक चव्हाण, संचालक : परीक्षा व मूल्यमापन मंडळ

विद्यापीठाकडून सर्व अभियांत्रिकी शिक्षण संस्थांना सूचना

पुणे – अभियांत्रिकी परीक्षेत कमी गुण मिळाल्यास फेरतपासणी व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात तात्पुरता (प्रोव्हिजनल) प्रवेश देताना यंदाही फक्‍त 10 टक्‍केच शुल्क आकारण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व अभियांत्रिकी शिक्षण संस्थांना दिले आहेत.

पुनर्मूल्यांकनच्या निकालानंतर प्रवेश कायम न झाल्यास दहा टक्‍के शुल्क संबंधित विद्यार्थ्यांना परत द्यावेत, असेही विद्यापीठाने सूचित केले आहे.

प्रक्रिया सुलभ
विद्यापीठाच्या विविध परीक्षांनंतर उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी (फोटोकॉपी) व पुनर्मूल्यांकनासाठी (रिव्हॅल्युएशन) आता विद्यार्थी महाविद्यालयांऐवजी थेट विद्यापीठाकडे अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टी मिळवण्याची प्रक्रिया सुलभ झाली असून, दोन्ही गोष्टींसाठी एकूण किमान दहा दिवसांचा वेळ वाचणार आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने थेट विद्यापीठाकडे अर्ज सादर करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाचा (रिव्हॅल्युएशन) निकाल किमान 10 दिवस आधी मिळणे शक्‍य होणार आहे, असे विद्यापीठाने कळविले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईनद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अभियांत्रिकी परीक्षेत दोन-तीन गुणांमुळे विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण होण्याची वेळ येते. द्वितीय, तृतीय अथवा चौथ्या वर्षात प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांना “एटीकेटी’ची सुविधा आहे. मात्र त्यानंतरही आवश्‍यक सर्व विषयात विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होता येत नाही. असे विद्यार्थी फेरतपासणी आणि पुनर्मूल्यांकनसाठी अर्ज करतात. त्याचदरम्यान पुढच्या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरू असतात. अशा वेळी विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्याची सुविधा आहे.

दरम्यान, तात्पुरता प्रवेश देत असताना विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची अट आहे. मात्र, परीक्षा विभागाकडून पुनर्मूल्यांकनचा निकाल येण्यास दिरंगाई होत असते. अशा परिस्थितीत तात्पुरता प्रवेश दिला जातो. हा प्रवेश देत असताना यापूर्वी विद्यार्थ्यांकडून संबंधित शिक्षण संस्था 50 टक्‍के शुल्क घेतले जात असत. विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश कायम ठेवून सर्व रक्‍कम घेतली जात होती. मात्र आता विद्यापीठाने गेल्या दोन – तीन वर्षापासून तात्पुरता प्रवेश देत असताना केवळ 10 टक्‍के शुल्क आकारावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानंतरही संस्था विद्यार्थ्यांकडून 50 टक्‍के नव्हे, तर संपूर्ण रक्‍कम घेत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.

त्या पार्श्‍वभूमीवर तात्पुरता प्रवेश देत असताना केवळ दहा टक्‍केच शुल्क घेणे आवश्‍यक आहे.
ही सवलत अभियांत्रिकी अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष 2018-19 या शैक्षणिकपुरता लागू राहील. पूनर्मूल्यांकनच्या निकालात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास प्रवेश कायम राहील. अनुत्तीर्ण झाल्यास प्रवेश रद्द होईल. मात्र, उत्तीर्ण झाल्यानंतर उर्वरित शुल्क घेण्यात यावे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)