पुणे : अनिल मुळे यांच्याकडे भूसंपादन विभागाचा पदभार

सतीश कुलकर्णी यांच्या निलंबनानंतर आयुक्तांचा निर्णय

पुणे- महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले उपायुक्त सतीश कुलकर्णी यांना राज्यशासनाने निलंबित केल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या मालमत्ता आणि व्यवस्थापन तसेच भूसंपादन विभागाची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अनिल मुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. हे अतिरिक्त पदभार देण्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काढले.

मागील महिन्यात 12 फेब्रुवारीला महापालिकेच्या उपायुक्त पदावरून कार्यमुक्त करून शासनाने सतीश कुलकर्णी यांची बदली उपसंचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालय, मुंबई या पदावर केली होती. त्यानंतरही कुलकर्णी तब्बल महिनाभरापासून महापालिकेतच कार्यरत होते. तसेच आयुक्तांनी त्यांना कार्यमुक्त केले नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे शासनाने कुलकर्णी यांना पुन्हा 12 मार्च 2018 ला आपल्या बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही कुलकर्णी बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

तर कुलकर्णी यांच्याकडे असलेल्या भूसंपादन विभागाच्या माध्यमातून चांदणी चौक तसेच शहरातील नदी सुधार योजना आणि मेट्रो प्रकल्पासाठी भूसंपादन तसेच जागा देण्याचे काम सुरू असल्याने या कामावर कुलकर्णी यांच्या निलंबनामुळे परिणाम होणार आहे. त्यामुळे या विभागाच्या प्रमुखपदी तातडीने अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी मागील आठवड्यात झालेल्या मुख्यसभेत करण्यात आली होती. त्यानुसार, सामान्य प्रशासन विभाग आणि दक्षता विभागाची अतिरिक्त जबाबदारी असलेल्या मुळे यांच्याकडे भूसंपादन विभागाचा पदभार देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)