पुणे – अतिक्रमण विभागातही खांदेपालट

कर्मचाऱ्यांची होणार बदली : पालिका राबविणार “कोल्हापूर पॅटर्न’

पुणे – अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी पालिकेकडून “कोल्हापूर पॅटर्न’ राबविला जाण्याची शक्‍यता आहे. शहर फेरीवाला समितीमध्ये पथारी व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींनी अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीत या विभागातील अतिक्रमण निरीक्षकांच्या बदलीचे धोरण नसल्याने कोल्हापूर महापालिकेकडून याबाबतची माहिती मागविण्यात आल्याचे अतिक्रमण विभागप्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेकडे अतिक्रमण निरीक्षक हे पद आहे. या पदासाठी सर्वेअरचा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागात सध्या 14 अतिक्रमण निरीक्षक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते याच विभागात आहेत. महापालिकेत सर्वेअरही शैक्षणिक अर्हता असलेली पदे बांधकाम विभाग तसेच भूसंपादन विभागाकडे आहेत. मात्र, या दोन्ही विभागांमध्ये या कर्मचाऱ्यांची बदली होत नाही. तसेच एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे हे कर्मचारी असल्याने त्यांच्यात कामात साचलेपण येऊन त्यांच्याकडून प्रभावीपणे काम होत नाही. तसेच अनेकदा आर्थिक हितसंबधही निर्माण होतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची बदली कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या धर्तीवर इतर विभागात करावी, अशी मागणी जाणीव संघटनेचे संजय शंके यांनी शहर फेरीवाला समितीत केली होती. मात्र, समितीच्या बैठकीत त्यावर अजून काहीही निर्णय झालेला नाही.

माहिती मिळताच पुढील निर्णय
अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी कोल्हापूर महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या प्रक्रीयेची माहिती मागविण्यात आली आहे. अतिक्रमण विभागाशी संबधित शैक्षणिक आर्हता असलेले काही विभाग पालिकेत आहेत. त्या विभागांमध्ये यांची बदली करणे शक्‍य आहे का, याबाबत सामान्य प्रशासन विभागाशी चर्चा सुरू असून कोल्हापूर महापालिकेची माहिती मिळाल्यानंतरच पुढील निर्णय घेतले जातील. तोपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बदल्या शक्‍य नाहीत, असे माधव जगताप यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)