पुणेसुद्धा मोठ्या संकटांच्या उंबरठ्यावर

नदी, ओढे, झऱ्यांवर अतिक्रमणे : पर्यावणप्रेमींनी व्यक्‍त केली चिंता

पुणे – केरळमधील पूरस्थिती ही एक धोक्‍याची सूचना आहे. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केल्यानेच अशा समस्या उद्‌भवतात. शहरातही नदी, ओढे, झऱ्यांवर अतिक्रमण केले जात आहे. पाण्याचे स्रोत बुजवून त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम केले जात आहे. यातून पर्यावणाचा ऱ्हास होत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर भविष्यात पुणे शहरातील नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे, अशी चिंता विविध पर्यावणप्रेमींकडून व्यक्त केली जात अहे.

केरळमधील पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. ही आपत्ती नैसर्गिक नसून, मानवनिर्मित आहे. पर्यावरण नियमांकडे करून संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्यानेच हे परिस्थिती उद्‌भवली असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले आहे.

शहरातील नद्या, ओढे, नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. जलस्रोतांचे नैसर्गिक प्रवाह वळविले जातात. तेथे अतिक्रमण करून इमारती उभारल्या जातात. तसेच पूररेषेच्या क्षेत्रातही अतिक्रमण केले जात आहे. नदीबाबतीतचे अतिक्रमण दिसून येते. मात्र ओढे, नाले यांची परिस्थिती गंभीर आहे. यामुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होत आहे. नद्या-नाले हे ‘नॅचरल ड्रेनेज’ म्हणून काम करतात. हे जर बंद करण्यात आले, तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील.
– आदिती देवधर, नदी पुनरुज्जीवन कार्यकर्त्या

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 2009 साली हवामान बदलाचा अभ्यास करण्यात आला होता. राज्यात “तेरी’ या संस्थेने हवामान बदलाच्या संभाव्य परिणामविषयक व्यापक अभ्यास करून अहवाल तयार केला होता. यानुसार देशातील पावसाचे प्रमाण 10-37.5 टक्‍यांनी वाढणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच पाणी साठविण्याची क्षमता वाढवावी, अशा सूचनादेखील राज्याला दिली होती. मात्र त्या सूचनांकडे सरकारने दुर्लक्ष केले. इतकेच नव्हे तर कॉंक्रिटीकरण, वृक्षतोड, टेकडीफोड यांसारख्या प्रकारामुळे पर्यावरणास हानी पोहचविण्यात आली. नदी परिसरातही अतिक्रमणे केली जात आहेत. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास आगामी काळात शहराला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल.
– अॅॅड. सारंग यादवाडकर, कायदे अभ्यासक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)