“पुणेरी पाट्यां’द्वारे स्वच्छतेबाबत मिळणार कानटोचण्या

नागरिकांना शिस्त लावण्यासाठी महापालिका भरविणार प्रदर्शन : पुणेकरांचे सल्लेही मागविणार

पुणे – आपल्या खास पुणेरी शैलीत शाब्दिक कोट्यांचा सल्ला देण्यात माहीर असलेल्या पुणेकरांना आता महापालिका स्वच्छतेचे संदेश “पुणेरी पाट्यां’च्या माध्यमातून देणार आहे. काही दिवसांपूर्वीच वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी पुणे पाट्यांचा उपक्रम सुरू केला आहे. त्याच धर्तीवर महापालिकेकडूनही आता हा उपक्रम प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरभर राबविण्यात येणार आहे.

एखाद्या घटनेवर अथवा परिस्थितीवर मार्मिक भाष्य करण्यासाठी पुणेरी पाट्या जगभर ओळखल्या जातात. या पाट्यांचा आधार आता महापालिकेकडूनही शहर स्वच्छतेसाठी घेतला जाणार आहे. शहर स्वच्छतेसाठी महापालिकेकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून पुणेकरांना कचरा साक्षरता तसेच स्वच्छतेचे धडे देण्यासाठी शहरात पुणेरी पाट्या लावण्यात येणार आहेत. या पाट्यांसाठीची बैठक नुकतीच महापालिका आयुक्‍तांकडे झाली असून पाट्यांच्या सादरीकरणही मागील आठवड्यात झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत करण्यात आले आहे. त्यानुसार, स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार असून पुढील आठवड्याभरात या पुणेरी पाट्या झळकणार आहेत.

सहभागी होण्याची संधी
या उपक्रमासाठी इरसाल पुणेकरांचे सल्लेही घेण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून जाहीर आवाहन करण्यात येणार असून कचऱ्याबाबत येणाऱ्या संदेशांची निवड करून हे संदेश पाट्यांसाठी वापरण्यात येणार आहेत. तर, या पाटीवर ज्या पुणेकरांचा हा संदेश असेल त्यांचे नावही झळकणार आहे. त्यामुळे पुणेकरांनाही या पाट्यांच्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)