पुणेकरांनो, आपली मेट्रो पाहता येणार

प्रतिकृती दाखल : माहिती केंद्र सुरू होण्यास स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त

पुणे – पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रतिकृतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्वातंत्र्यदिनी या प्रतिकृतीचे उद्‌घाटन करण्यात येणार असून त्यानंतर पुणे मेट्रो कशी असेल, हे प्रत्यक्ष पुणेकरांना पाहता येणार आहे.

पुणे मेट्रोचे काम 2016 मध्ये सुरू झाल्यानंतर महामेट्रो आणि महापालिकेकडून प्रकल्पाच्या प्रतिकृती ठेवण्यासाठी जागेचा शोध सुरू होता. तब्बल दीड वर्षे महापालिका आणि महामेट्रोकडून जागा शोधण्यात आल्यानंतर हा जागेचा शोध संपला आहे. काम पूर्ण होईपर्यंत मेट्रो प्रतिकृतीसाठी संभाजी उद्यानातील महापालिकेने 2 गुंठे जागा दिली आहे. या जागेत ही बोगीची प्रतिकृती ठेवली जाणार आहे. मात्र, ही बोगी नागपूर येथे तयार करण्यात येत होती. तर संभाजी उद्यानाची ही जागा तीन महिन्यांपूर्वी निश्‍चित करण्यात आली. त्यानंतर अखेर प्रत्यक्ष पुणे मेट्रो कशी असेल, याची प्रतिकृती पुणेकरांना पाहण्याचा मार्ग मोकळा झाला असून 15 ऑगस्टपासून ही प्रतिकृती पुणेकरांना संभाजी उद्यानात पाहता येणार आहे.

लेखाजोखा मांडणार
संभाजी उद्यानात उभारल्या जाणाऱ्या या माहिती केंद्रात मेट्रो प्रकल्पाची संपूर्ण माहिती मिळणार आहे. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्प कसा असेल, त्यासाठी किती खर्च आला आहे, त्यात स्थानके किती, मेट्रोचे इंजिन कसे असते, डबे कसे असतात, याची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. याशिवाय, या प्रकल्पाचे सादरीकरणही या ठिकाणी असणार आहे. दरम्यान, ही प्रतिकृती रविवारी पुण्यात दाखल झाली असून सोमवारी ती संभाजी उद्यानातील नियोजित जागी बसविली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)