पुणेकरांना पालिकेच्या दिरंगाईचा फटका

40 वर्षांत 34 जागा ताब्यात; तर अवघी 15 पार्किंग विकसित

पुणे – शहरातील खासगी वाहनांच्या बेसुमार वापरामुळे पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. या वाहनांना आळा घालण्यासाठी महापालिकेने नागरिकांकडून भरमसाठ शुल्क आकारण्याची “पे ऍन्ड पार्क’ योजना राबविण्यात येणार असतानाच; गेल्या 40 वर्षांत महापालिकेस शहरात केवळ 15 पार्किंग विकसित करता आली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शहराच्या जुन्या हद्दीबरोबर समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यात आतापर्यंत 198 ठिकाणी पार्किगची आरक्षणे टाकण्यात आली आहेत, मात्र, पन्नास वर्षांत यामधील 25 टक्के जागाही पालिकेस ताब्यात घेता आलेली नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या मुख्यसभेसाठी शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नांच्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.

शहराच्या विकास आराखड्यात आतापर्यंत पार्किंगची किती आरक्षणे टाकण्यात आली होती, त्यामधील किती जागा प्रत्यक्षात ताब्यात आल्या आणि त्यामधील किती जागांवर पालिकेने पार्किंग विकसीत केले आहे, असे प्रश्‍न सुतार यांनी विचारले होते. त्यावर प्रशासनाने दिलेल्या उत्तरात शहराच्या 1966 च्या डिपीत पार्किंगची 19 आरक्षणे होती, त्यानंतर 1987 च्या डिपीत 26 आरक्षणे टाकण्यात आली होती, 2017 च्या डिपीत 101 आरक्षणे टाकण्यात आली आहेत, तर पालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या डिपीत 42 आणि येवलेवाडीच्या प्रारुप डिपीत 1 अशी गेल्या 40 ते 50 वर्षांत तब्बल 198 पार्किंगची आरक्षणे टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामधील केवळ 34 जागा पालिकेने ताब्यात घेतल्या असून त्यामधील फक्त 15 जागांवरच प्रत्यक्षात पार्किंग विकसीत करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एकिकडे शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी प्रशासन संपुर्ण शहरातील रस्त्यावर “पे ऍन्ड पार्क’ राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, दुसरीकडे डिपीत पार्किंगसाठी टाकलेल्या आरक्षणाच्या जागा ताब्यात घेण्यास आणि आलेल्या जागा विकसीत करण्यात प्रशासन अपयशी ठरले असल्याचे सिध्द होत आहे. मात्र, त्याचा फटका पुणेकरांना सहन करावा लागत आहे.

महापालिकेचे अपयश; पुणेकरांवर पार्किंगचे भूत
एका बाजूला शहरात पार्किंगची समस्या गंभीर झाल्याने भरमसाठ पार्किंग शुल्क आकारल्यास नागरिक खासगी वाहनांचा प्रवास टाळून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला भर देतील अशी अटकळ बांधत महापालिकेकडून शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी “पे ऍन्ड पार्क’ योजना आणली आहे. त्यातून वर्षाला दिडशे कोटींचा महसूलही मिळेल असा पालिकेचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, प्रत्यक्षात दुसऱ्या बाजूला महापालिकेनेच पार्किंगच विकसित केली नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव आपली वाहने रस्त्यावर पार्क करावी लागत आहेत. त्यामुळे पालिकेने पार्किंगच्या जागा वेळीच ताब्यात घेऊन त्या विकसित केल्यास पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होणार असून पुणेकरांच्या मानगुटीवर “पे ऍन्ड पार्क’चे भुतही बसविण्याची गरज महापालिकेस भासणार नाही.

विकसीत केलेल्या पार्किंगच्या जागा
कै. सतीशशेठ मिसाळ वाहनतळ (महात्मा फुले मंडई), हुतात्मा बाबू गेणू वाहनतळ (महात्मा फुले मंडई), कै. शिवाजीराव कृष्णराव आढाव वाहनतळ (हमालवाडा), पुणे मनपा वाहनतळ भवन, कै. तुकारामशेठ शिंदे वाहनतळ (पुणे स्टेशन), वैकुंठ स्मशानभुमी, भाऊ महाराज बोळ, संगमघाट, संभाजी पार्क यांत्रिक वाहनतळ, स्वारगेट-छत्रपती शाहू महाराज बसस्थानक, कात्रज-राजीव गांधी प्राणी संग्रहालय, पीएमपीएमएल डेपो कात्रज, कात्रज जकात नका आणि सावरकर भवन इमारत पार्किग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)