पुणेकरांना दिलासा; पाणी कपात नाही

तातडीने बोलावलेल्या बैठकीत शहराच्या पाण्याबाबत चर्चा


जलसंपदा विभाग कपातीसाठी आग्रही

पुणे – राज्य शासनाने महापालिकेस संपूर्ण वर्षांसाठी मंजूर करून दिलेल्या प्रतिदिन 900 एमएलडी पाणीच वापरणे बंधनकारक असून पालिकेने तातडीने त्याबाबत उपाययोजना कराव्यात अशा सूचना वजा आदेश पुन्हा जलसंपदा विभागाकडून पालिकेस देण्यात आला आहे. पुणे शहराच्या पाण्याबाबत जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने दिलेल्या निकालानुसार, महापालिकेने पाण्याचे नियोजन करावे यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या पुणे विभागाच्या कार्यकारी अधिक्षकांनी गुरुवारी तातडीची बैठक बोलाविली होती. यात शहराच्या पाण्याबाबत चर्चा करण्यात आली असून चर्चेचा अहवाल जलसंपत्तीमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने महापालिकेने वर्षाला लोकसंख्येच्या निकषानुसार 8.19 टीएमसी पाणी वापरावे, असे आदेश दिले आहेत. तर शासनाने महापालिकेस 2011 मध्ये प्रतिवर्षी 11.50 टीएमसी पाणीसाठा मंजूर केला आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेकडून वर्षाला 14 ते 15 टीएमसी पाणी वापरले जात आहे. त्यातच राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने महापालिकेने जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह पालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत आयुक्तांनी शहरातील पाण्याची सद्यस्थिती तसेच महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली; तसेच शासनाने मंजूर केलेला पाणीकोटा 2011 मध्ये मंजूर करण्यात आलेला असून 2018 पर्यंत शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या लोकसंख्येचा विचार करून वाढीव पाणी कोट्यासाठी शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याची भूमिका घेत पाणी कमी करू नये, अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र, प्राधिकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी बंधनकारक असल्याचे सांगत, महापालिकेने दरदिवशी 900 एमएलडी पाणी देण्याच्या अनुषंगाने नियोजन करावे, असा आग्रह पाटबंधारे विभागाकडून कायम ठेवण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाढीव पाणी कोट्यासाठी शासनाला अहवाल
शासनाने महापालिकेस 2011 मध्ये पाणीकोटा मंजूर केला आहे. 2018 पर्यंत हाच कोटा कायम आहे. त्या तुलनेत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पालिकेकडून वाढीव पाणी कोट्यासाठी शासनाला अहवाल पाठविण्यात येत असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. शहरात कोणत्याही स्थितीत आणखी पाणी कपात होणार नाही यासाठी मुख्यमंत्री तसेच जलसंपदामंत्र्यांशी संपर्क साधण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शिवाय, आयुक्तांनाही पाण्याच्या नियोजनाबाबत सूचना देण्यात आल्या असून पाण्याचा गैरवापर टाळणे तसेच इतर उपाययोजना करण्याबाबतही चर्चा झाल्याचे टिळक यांनी सांगितले.

आज पालकमंत्री घेणार बैठक
जलसंपदा विभाग कपातीसाठी आग्रही असल्याने, या विषयावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली महापौर बंगल्यावर बैठक बोलविण्यात आली आहे. पालिका आयुक्तांनी केलेल्या विनंतीनुसार, ही बैठक होणार असून 900 एमएलडी ऐवजी 1150 एमएलडी आणि शक्‍य असल्यास 1350 एमएलडी पाणी मिळावे यावर निर्णय घेण्यासाठी ही बैठक होणार आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)