पुणेकरांची पाणीकपात टळली

कालवा समिती बैठकीतील निर्णय 


शेतीलाही पाणी देण्याचे नियोजन

पुणे- शहराच्या पाणी पुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात येणार नसल्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे यंदा पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर पुणे शहराला दररोज 1350 एमएलडी इतके पाणी उचलण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतीसाठी पाणी तसेच बाष्पीभवन याचा विचार करता महापालिकेने पाणी काटकसरीने वापरावे, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे. भविष्यकाळात पुणेकरांना पाणी मिळेल, तसेच शेतीलाही पाणी मिळेल, असे नियोजन केले असल्याचेही बापट यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृह येथे कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, दत्तात्रय भरणे, राहुल कुल, मेधा कुलकर्णी, सुरेश गोरे, भिमराव तापकीर , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, यांच्यासह महापालिका आणि पाटबंधारे विभागातील अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये जिल्ह्यातील आमदारांनी तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहराकडून मंजूर कोट्यापेक्षा धरणातून अधिक पाणी उचलत असल्याचा आरोप केला. यावर पुणे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता व्ही.जी.कुलकर्णी म्हणाले, पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते कॅन्टॉमेन्ट दरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाले नसल्यामुळे सध्या कालव्यातून पाणी उचलावे लागते. त्यासाठी कालव्यात जादा दाबाने पाणी सोडावे लागते. त्यामुळे पाण्याचा जादा वापर झाला.

यावर पालकमंत्री बापट म्हणाले, शहर आणि ग्रामीण असा भेदभाव करता येणार नाही. परंतु महापालिकेने देखील मान्य असलेल्या पाणी कोट्यापेक्षा जादा पाण्याचा वापर करू नये. शहराला दररोज सध्या 1350 एमएलडी पाण्याची कोटा मंजूर आहे. त्यानुसार पाणी पुरवठा करण्यात येईल. तसेच पाटबंधारे खात्याने ज्या सूचना केल्या आहेत. त्या नुसार कुठे पाणी बचत करता येईल, गळती कशी रोखता येईल, यासाठी सर्व घटकांनी तातडीने एकत्रित बैठक घेऊन महापालिकेने उपाययोजना कराव्यात. पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढते क्षेत्र याचा विचार करता आधी आठ -नऊ महिने पाणी व्यवस्थित दिले आहे. आताही पाणी देणार आहोत, असेही बापट यांनी सांगितले.

भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचे काम सुरू आहे. पुण्यासाठी पाण्याचा प्रश्‍न शिल्लक ठेवणार नाही. तसेच शेतकरीही उपाशी राहणार नाही. शेतीलाही पाणी देण्यात येईल, असे बापट यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने घरगुती आणि औद्योगिक पाणी पुरवठ्याच्या दरास नुकतीच वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यांची अंमलबजावणी 1 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली आहे. पाणीपट्टीची थकबाकी ही भरावीच लागणार आहे. त्या निधीतून कर्मचाऱ्यांचे वेतन यांच्यासह देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. दुरुस्तीमुळे पाण्याची गळती थांबेल. पाण्याचा अपव्यय थांबले. काही ठिकाणी 40 टक्के गळती आहे. तीही कमी केली पाहिजे, असे बापट यांनी सांगितले.

महापालिकेने अतिरिक्‍त पाणी उचलले : पाटबंधारे
खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठा आणि त्याचे नियोजन याचे सादरीकरण पाटबंधारे विभागाने केले. पुणे शहरासाठी कालवा सल्लागार समितीने 1350 एमएलडी पाणी पुरवठा शहरासाठी मंजूर केला आहे. परंतु, जानेवारी आणि फेब्रुवारीत महापालिकेकडून 1600 एमएलडी पाण्याचा वापर केल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

शेतकऱ्यांनी वाचविले अडीच टीएमसी पाणी
धरणातून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या दोन आर्वतनामध्ये नियोजन करून अडीच टीएमसी पाणी वाचविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेही आभार मानले पाहिजेत. मागील वेळीही शेतीला पाणी कमी पडू दिल नव्हते. चार महिन्यात पडणाऱ्या पावसातून बारा महिन्यासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. त्यामध्ये शहरी व ग्रामीण असा वाद नसल्याचे बापट यांनी सांगितले.

 

धरणाचे नाव- उपलब्ध पाणीसाठा – टक्केवारी
खडकवासला – 1.20 टीएमसी – 60.03 टक्के
पानशेत – 6.87 टीएमसी – 64.52 टक्के
वरसगाव – 5.68 टीएमसी -44.27 टक्के
एकूण – 13.75 टीएमसी – 56.27 टक्के

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)