पुढे काय?

मयूर सोनावणे

जिल्ह्यातून जाणाऱ्या सहा पदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. हे काम करत असताना नव्याने तयार करण्यात आलेल्या सेवा रस्त्याचे काम हे फारसे दर्जेदार झालेले नाही हे गतवर्षीच्या आणि यंदाच्या पावसाने उघडकीस आणले आहे. दर्जाहिन कामामुळे अनेकठिकाणी सेवारस्ते खचले आहेत तर अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. याशिवाय महामार्ग ओलांडण्यासाठी काही ठिकाणी उड्डाणपुल तर काही ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आले.

यापैकी जावली तालुक्‍यातील महामार्गाच्या एका बाजुला असलेल्या रायगाव आणि दुसऱ्या बाजुला असलेल्या ढगेवाडी या गावांना महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. सुरुवातीच्या काळात गैरसोय टळल्याने दोन्ही गावांमधील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, पावसाळा सुरु झाला आणि ग्रामस्थांच्या या आनंदावर विरजन पडले. त्याला कारणही तसेच आहे.

-Ads-

ग्रामस्थांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेला भुयारी मार्गामुळेच ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. पावसामुळे या भुयारी मार्ग पूर्णत: जलमय झाला. या भुयारी मार्गाला एखाद्या तलावाचे स्वरुप प्राप्त झाले. महामार्गाच्या दोन्ही बाजुला चढ असल्यामुळे पावसाचे येणारी पाणी जाण्यासाठी पर्यायी मार्गच उरला नसल्यामुळे हे पाणी साठत होते. सुमारे चार-पाच फूट उंच पाणी साठल्याने या मार्गातून चालत जाणेही अशक्‍य झाले.

पावसामुळे भुयारी मार्ग पाण्याखाली गेला, ग्रामस्थांची गैरसोय होऊ लागली आहे, या आशयाच्या बातम्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्धही झाल्या. त्यानंतर संबंधित ठेकेदारांनी याठिकाणी येऊन पाहणीदेखील केली. मात्र, पुढे काय? हा प्रश्‍न निर्माण झाला. तो आजही तसाच आहे. दोन वर्षात 10 पेक्षाही अधिकवेळा हा भुयारी मार्ग पाण्याखाली गेला. बऱ्याचवेळा साचलेले पाणी किती प्रमाणात आहे याचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहने पाण्यात अडकली आणि बंदही पडली. नुकत्याच आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पुन्हा हा भुयारी मार्ग पाण्याखाली गेला. पुन्हा दोन दिवस ग्रामस्थांची गैरसोय झाली. नेहमीप्रमाणे पुन्हा रिलायन्सचे अधिकारी याठिकाणी येऊन पाहणी करुन गेले, परत तोच प्रश्‍न “पुढे काय?’

यापुढेही दरवर्षी पावसाळ्यात याशिवाय इतरही अवेळी पडणाऱ्या पावसात हा भुयारी मार्ग पाण्याखाली जाणार हे निश्‍चित आहे. पुन्हा वृत्तपत्रांमधून बातम्याद्वारे हा विषय चवीने चघळला जाणार, चार-आठ दिवस चर्चा होणार, प्रशासनाचे तसेच रस्ते बनविण्याचा ठेका घेणाऱ्या कंपनीचे अधिकारी येणार आणि पाहणी करणार, एवढच घडणार. “पण पुढे काय?’ हा प्रश्‍न कायम राहणार.

“पुढे काय?’ या प्रश्‍नाचे कोडे सुटणार का? भुयारी मार्ग पाण्याखाली जाऊ नये यासाठी ठोस कार्यवाही होणार का? मुळातच चुकीच्या पद्धतीने भुयारी मार्ग बांधल्यामुळे हे पाणी साठत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार कंपनीवर शासन कारवाई करणार का? त्यांची पाठराखण करुन ग्रामस्थांची बोळवण करणार? ही सर्व प्रश्‍न अनुत्तरतीच राहणार हे मात्र नक्की. ठराविक काळापुरती जनता ओरडते पुन्हा शांत बसते हे लोकप्रतिनिधींसह शासनालाही माहित झाले आहे. त्यामुळे या भुयारी मार्गाप्रमाणे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत ते भविष्यात तरी सुटतील की नाही, हेदेखील सांगता येत नाही एवढच खरं.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)