पुढील हंगामात 9 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

श्रीगोंदा – “”या वर्षीच्या हंगामात “नागवडे’ साखर कारखान्याने कमी दिवसात चांगले व विक्रमी गाळप केले आहे. सामूहिक प्रयत्नांतून हंगाम यशस्वी पार पडला आहे. पुढील वर्षीच्या हंगामात या वर्षीच्या तुलनेत अधिक ऊसउत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या गळीत हंगामात नऊ लाख मेट्रिक उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,” असे प्रतिपादन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले. यावर्षीच्या हंगामात “नागवडे’ कारखान्याने कमी कालावधीत विक्रमी गाळप करीत साडेसहा लाख मेट्रिक टनावर गाळप करून जवळपास सव्वासात लाख साखर पोती उत्पादित केल्याचे त्यांनी सांगितले.

“नागवडे’च्या 44 व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचे संचालक ऍड. सुनील भोस, सोपानराव खोमणे व ऊसतोड मुकादमांच्या हस्ते पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून नागवडे म्हणाले की, राज्य व केंद्र सरकारची धोरणे शेतकरी व सहकाराला मारक आहेत. सहकारी साखर कारखानदारी संक्रमण अवस्थेतून वाटचाल करीत आहे. काटकसरी व पारदर्शी कारभार करून सभासद व शेतकऱ्यांना नेहमीच मदत करण्याची “नागवडे’च्या व्यवस्थापनाची परंपरा आहे.

राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडेंच्या मार्गदर्शनाखाली कारखाना यंत्रसामुग्रीत आवश्‍यक बदल करून पुढील हंगामात प्रतिदिन सहा हजार मे. टनावर गाळप करण्याचा प्रयत्न आहे. कारखान्याची डिस्टीलरी लवकरच सुरू होणार आहे, असे सांगून ते म्हणाले की, शेतक-यांनी आता पाणी बचतीचे महत्त्व ओळखणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन पध्दतीचा अधिकाधिक अवलंब करण्याशिवाय पर्याय नाही. पारंपरिक शेती पध्दतीला फाटा देऊन शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांची पिके घ्यावीत. शेतकऱ्यांनी एकरी उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील राहून शेतीत नवीन प्रयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर म्हणाले की, यावर्षी देशात व राज्यात विक्रमी ऊस, साखरेचे उत्पादन झाल्याने साखरेच्या भावात घसरण झाली. त्याचा परिणाम ऊस दरावर झाला आहे. साखर दरातील घसरणीमुळे साखर कारखाने आर्थिक संकटात सापडले आहेत. अन्य शेतमालाचे दरही कोलमडले आहेत. टोमॅटो, कोथिंबीर यासारखी पिके शेतकरी दराअभावी रस्त्यावर टाकून देत आहेत. “नागवडे’चा गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्यात शेतकरी, सभासद, ऊसउत्पादक, कामगार व ऊसतोडणी मजुरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.

या वर्षीच्या हंगामात सर्वाधिक ऊसतोड, वाहतूक करणाऱ्या ऊसतोडणी टोळी मुकादमांचा व मजुरांचा सत्कार संचालक मंडळाने केला. यावेळी माजी सभापती अरुणराव पाचपुते यांचे भाषण झाले. कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे, विश्‍वनाथ गिरमकर, राजकुमार पाटील, विजय कापसे, विलासराव काकडे, शिवाजीराव जगताप, श्रीनिवास घाटगे, ऍड. अशोकराव रोडे, ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तमराव नागवडे, बाबासाहेब भोयटे, नितीन वाबळे, आदी उपस्थित होते.
कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब बांदल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर शेतकी अधिकारी शशिकांत आंधळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, शेतकरी, सभासद, कामगार व ऊसतोडणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)