पुढील लोकसभा निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर व्हावा

मागणीसाठी विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे; ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा येणार ऐरणीवर
नवी दिल्ली – पुढील लोकसभा निवडणूूक मतपत्रिकांच्या माध्यमातून घेण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. ही मागणी मांडण्यासाठी सतरा विरोधी पक्ष लवकरच निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावणार आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून भाजपने केंद्राची सत्ता मिळवली. त्यानंतर विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा आणि इतर निवडणुकांमध्ये भाजपच्या यशाचा वारू चौखूर उधळला. मात्र, भाजपच्या या यशामागे इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील (ईव्हीएम) फेरफार असल्याचा आरोप विरोधकांनी केला. ईव्हीएमच्या विश्‍वासार्हतेबाबत विरोधकांकडून सातत्याने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले गेले. आता पुढील वर्षीची लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याच्या पार्श्‍वभूमीवर तृणमूल कॉंग्रेसने घेतलेल्या पुढाकारातून पुन्हा ईव्हीएमचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तृणमूलच्या प्रमुख आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी त्यांनी ईव्हीएमच्या मुद्‌द्‌यावरून विरोधकांचे संयुक्त शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे आवाहन केले. यासंदर्भातील विरोधकांच्या हालचालींना तृणमूलचेच खासदार डेरेक ओब्रायन यांनी दुजोरा दिला. ईव्हीएम आणि मतपत्रिकांच्या मुद्‌द्‌यावर पुढील आठवड्यात 17 विरोधी पक्षांची बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेलाही शिष्टमंडळात सहभागी होण्याचे आवाहन तृणमूलकडून करण्यात आले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याआधीच पुढील लोकसभा निवडणूक मतपत्रिकांच्या माध्यमातून घेण्याची भूमिका मांडली आहे. आता ईव्हीएम आणि मतपत्रिकांच्या मुद्‌द्‌यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याचे संकेत मिळत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)