पुढच्यावर्षीपासून गणेशोत्सवाच्या छायाचित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन – महापौर

पुणे – पुढच्यावर्षीपासून गणेशोत्सवाच्या छायाचित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन भरविण्यात येईल, अशी घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी गुरूवारी केली. गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने आणि पुणे श्रमिक पत्रकारसंघाच्या सहकार्याने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन टिळक यांच्या हस्ते करण्यात आले.

महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, सरस्वती शेंडगे, स्मिता वस्ते या नगरसेविका, ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे आदी उपस्थित होते.

पुढच्या वर्षीपासून गणेशोत्सवाच्या छायाचित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन भरविण्यात येईल. असे कायमस्वरूपी प्रदर्शन असल्यास पर्यटकांना गणेशोत्सवाची माहिती मिळेल. गणेशोत्सवाचा इतिहास समजेल. गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने आपण नवीन वाटचाल करीत आहोत. यानिमित्ताने रहिवासीही आपल्याला जोडले जातील, असे टिळक म्हणाल्या.

छायाचित्रकारांनी गणेशोत्सवातील अचूक क्षण टिपले आहेत. पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सवाची पर्यटकांना माहिती मिळावी, यासाठी शहराच्या विविध भागातील आर्ट गॅलरीमध्येवृत्तपत्रातील छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन भरविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच जुन्या काळातील छायाचित्रांचाही समावेश यामध्ये करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे मोहोळ म्हणाले.

पुढील वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षातील सुरूवातीपासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत आयोजित केलेल्या विविध उपक्रमांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले जाईल, असे भिमाले म्हणाले.

यानिमित्ताने पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली. त्याचा बक्षीस समारंभही महापौर मुक्ता टिळक आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या हस्ते झाला. यामध्ये प्रथम क्रमांक राहुल देशमुख(महाराष्ट्र टाईम्स), द्वितीय क्रमांक पवन खेंगरे (इंडियन एक्‍सप्रेस) आणि तृतीय क्रमांक निखिल घोरपडे (पुणे मिरर) यांनी मिळवला. छायाचित्रांचे परीक्षण ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)