पुढचा सुपरस्टार कोण?

सोनम परब

बॉलीवूडमध्ये सध्या नव्या दमाच्या नायकांची चलती सुरू झाली आहे. मागील काळात शाहरुख खान, सलमान खान आणि आमीर खान या खानत्रयींसह अक्षयकुमारने सुपरस्टारपदावर हुकूमत गाजवली. आताच्या काळात त्यांची जागा कोण घेणार असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला होता. मात्र रणवीर सिंह, रणबीर कपूर, वरुण धवन आणि टायगर श्रॉफ यांनी या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. सुशांतसिंह रजपूतही या रेसमध्ये आहे. यातील बहुतांश नायकांनी स्वतःचा प्रेक्षकवर्ग तयार करण्यात यश मिळवले आहे. येणारा काळ त्यांच्या सुपरस्टार बनण्याच्या दिशने सुरू असलेल्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असेल.

“बागी 2′ या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर आश्‍चर्यकारक आकडे समोर आणले आहेत. पहिल्या दिवशीची आकडेवारी पाहता टायगर श्रॉफच्या या चित्रपटाने रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या “पद्मावत’ चित्रपटालाही मागे टाकले आहे. बागी 2 चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे टायगर श्रॉफ बॉक्‍स ऑफिसवर हवा करणार यात काही शंका नाही. सध्या खानत्रयींची जागा घेण्यासाठी तयार असणाऱ्या रणबीर कपूर, रणवीर सिंह आणि वरुण धवन यांच्यासोबत आता टायगरचे नावही जोडले गेले आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष हे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण फिल्म इंडस्ट्रीचा पुढचा सुपर स्टार कोण सिद्ध होईल हे याचवर्षी स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे.

आपल्याकडे प्रत्येक अभिनेत्याचा एक खास दर्शक असतो. शाहरुख खान, सलमान खान आणि आमीर खान या खानत्रयी दीर्घकाळ बॉलीवूडवर अधिराज्य गाजवत राहिल्या असल्या तरी या प्रत्येकाचाही स्वतःचा असा चाहता प्रेक्षकवर्ग आहे. हा वर्ग त्यांच्या अभिनेत्याचा चित्रपट पहिल्या दिवशी चित्रपटगृहात जाऊन पाहण्यावर भर देतो. हाच फॅन बेस या कलाकारांच्या स्टारडमचा निदर्शक असतो.
नव्या पिढीतील कोणता अभिनेता सुपरस्टार होईल यावर एका पोर्टलने काही दिवसांपूर्वी वाचकांकडून सर्व्हेक्षण केले होते. यामध्ये रणबीर कपूरला सर्वाधिक म्हणजे 40 टक्‍के मते मिळाली. यामध्ये 20 टक्‍के मते मिळवून रणवीर सिंह तिसऱ्या स्थानावर राहिला; तर वरुण धवन 26 टक्‍के घेऊन दुसऱ्या स्थानावर राहिला. या सर्वेक्षणात टायगर श्रॉफला केवळ 14 टक्‍के मते मिळाली होती.
पोर्टलच्या सर्व्हेक्षणात दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या वरुण धवनच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांनी 50 कोटीपेक्षा अधिक यवसाय केला आहे. केवळ “बदलापूर’ या चित्रपटाने 49.62 कोटींचा व्यवसाय केला आहे. मात्र “जुडवा 2′ आणि “बद्रीनाथ की दुल्हनिया’ने 100 कोटींच्या क्‍लबमध्ये पोहोचण्याचा विक्रम केला. या महिन्यात वरुणचा “अक्‍टूबर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून त्याची बॉक्‍स ऑफिसवरील परीक्षा होईल.

या सर्वेक्षणात रणवीर सिंह तिसऱ्या स्थानावर गेला असला तरी त्याची प्रमुख भूमिका असणारा “पद्मावत’ हा बहुचर्चित चित्रपट सुपरहिट झाला. आजच्या परिस्थितीत रणवीर हा एकमेव अभिनेता आहे ज्याच्या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर 300 कोटींपेक्षा अधिक व्यावसाय केला आहे. आगामी काळात त्याला घेऊन अनेक महागड्या आणि मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. यामध्ये जोया अख्तरचा “गली बॉय’ आणि रोहित शेट्टीचा “सिम्बा’ यांचा समावेश आहे.

रणबीर कपूरचा विचार करायचा झाल्यास त्याचे यापूर्वीचे काही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर फारसा जलवा दाखवू शकले नाहीत. “ए दिल है मुश्‍किल’च्या यशानंतर “जग्गा जासूस’मध्ये रणबीर अयशस्वी ठरला. मात्र, तरीही रणबीर कपूर नव्या पिढीतील सर्वात प्रतिभाशाली आणि बॉक्‍स ऑफिसवरील विश्‍वासास पात्र असा अभिनेता आहे. त्याच्या चित्रपटांना पहिल्या दिवशी होणारी गर्दी पाहता हे सिद्ध होते. रणबीर कपूरचे जे चित्रपट फ्लॉप झाले आहेत त्यामध्येही त्याचा अभिनय सरस राहिला आहे. या सर्व चित्रपटांची स्क्रिप्टच खराब होती. असे असूनही रणबीरने या चित्रपटांना चांगली सुरुवात करून दिली होती. रणबीर कपूरला तरुणपिढीत असणारी लोकप्रियता लक्षात घेऊनच निर्माते दिग्दर्शक आजही त्याच्यावर पैसे लावायला तयार आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे “संजू’ या अभिनेता संजय दत्तवर आधारित बायोपिक चित्रपटात रणबीर प्रमुख भूमिकेत आहे. करण जोहरने “ब्रह्मास्र’ या त्याच्या सर्वात महागड्या, फॅंटसी आणि ऍडव्हेंचरस चित्रपटाचा नायक म्हणूनही रणबीरची निवड केली आहे. हे दोन्ही चित्रपट रणबीरच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

आता टायगर श्रॉफकडे वळूया. टायगरने 2014 मध्ये शब्बीर खान दिग्दर्शित “हिरोपंती’ या ऍक्‍शन मूव्हीमधून बॉलीवूड क्षेत्रात पदार्पण केले होते. त्याचा हा चित्रपट हिट झाला होता. यानंतर आलेल्या “बागी’लाही चांगले यश मिळाले. मात्र त्यानंतर आलेले “अ फ्लाइंग जेट’ आणि “मुन्ना मायकल’ हे दोन चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर विशेष व्यवसाय करू शकले नाहीत. या अपयशामुळे त्याची वरील सर्वेक्षणात घसरण झाली असावी. मात्र, टायगर हा आजचा ऍक्‍शन स्टार आहे. त्याला मोठ-मोठ्या चित्रपट निर्मात्यांचे समर्थन मिळत आहे. ऍक्‍शनबरोबरच टायगर नृत्यामध्येही सरस आहे.

या कलाकारांशिवायही फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतरही युवा कलाकार आहेत. यामध्ये सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. सुशांतने आतापर्यंत काई पो चे, शुद्ध देसी रोमांस, पीके आणि एमएस धोनी अ अनटोल्ड स्टोरी यांसारख्या चित्रपटातून दमदार अभिनय केला आहे. “राबता’सारख्या महागड्या चित्रपटाचा तो नायक होता. सध्या त्याला सोबत घेऊन “ऍक्‍शन ड्राइव्ह’ तयार केला जात आहे. तसेच “केदारनाथ’ या चित्रपटाचीही चांगलीच चर्चा आहे. याखेरीज सुशांत “सोन चिडिया’ या चित्रपटातून डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. द फाल्ट इन आवर स्टार्सच्या रिमेकमध्येही तो नायक आहे. त्यामुळे आगामी सुपरस्टारच्या रेसचा विचार करताना सुशांतला दुर्लक्षून चालणार नाही. याशिवाय अर्जुन कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे देखील आहेत. मात्र, ते अभिनयाच्या बाबतीच कच्चे आहेत. या युवा अभिनेत्यांमध्ये राजकुमार रावला एका संधीची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)