“पीडीसी’ च्या प्रगतीचा आलेख अव्वल

वडगाव मावळ : बॅंकेच्या 100 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रम नियोजन बैठकीत बोलताना रमेश थोरात. यावेळी बाळासाहेब नेवाळे आदी मान्यवर.
  • बॅंकेचा वर्धापन दिन : सहाशे कोटींच्या जुन्या नोटा मिळवण्यासाठी याचिका दाखल करणार

वडगाव-मावळ, (वार्ताहर) – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारदर्शी, शिस्तबद्ध, निर्णयक्षम कारभाराने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रगतीचा आलेख कायम वाढत आहे. शून्य व्याज दराने सर्वाधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज देणारी देशात प्रथम क्रमांकाची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आहे. नोटा बंदीच्या काळात पावणे सहाशे कोटीच्या जुन्या नोटा सांभाळल्याने या बॅंकेचा इतिहास दिल्लीत पोहचला आहे. या पावणे सहाशे कोटी रुपयांचे त्यावेळचे 20 कोटी रुपये व्याज वसूल करण्यासाठी याचिका दाखल करणार आहे.

देशातील 371 जिल्हा बॅंकां पैकी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक अग्रेसर आहे. रविवार दि. 10 सप्टेंबरला कृषी महाविद्यालय (शिवाजीनगर) मैदानात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 100 व्या वर्धापनदिनानिमित्त केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहणार आहेत. यावेळी मावळातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक अध्यक्ष रमेश थोरात यांनी केले.

वडगाव-मावळ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात मंगळवार दि. 29 ला सकाळी 11 वाजता बॅंकेच्या 100 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रम नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्षा अर्चना घारे, संचालक बाळासाहेब नेवाळे, राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक संघ जिल्हाध्यक्ष काळूराम मालपोटे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शेवाळे, मंगेश काका ढोरे, श्‍यामराव पाळेकर, छबुराव कडू, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष रमेश गायकवाड, सुनील ढोरे, विलास दंडेल, प्रकाश पवार, बाळासाहेब म्हाळसकर, संभाजी टेमगिरे, विजय काळोखे, नामदेव ठुले, मदन अडीवळे, विष्णू मुऱ्हे, बंडोबा सातकर, बाळासाहेब धामणकर, रमेश पिंगळे, आशिष ढोरे, लक्ष्मण बालगुडे, शिवाजी आसवले, माउली आढाव, संजय मोहोळ, संतोष राऊत, विभागीय अधिकारी राजेंद्र आढारी, दिलीप पगडे मावळ तालुक्‍यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे बहुसंख्येने चेअरमन, संचालक, सचिव व सभासद उपस्थित होते.

थोरात म्हणाले, 1989 साली अडीचशे कोटीचीउलाढाल असलेल्या या बॅंकेचा स्वनिधीच 1,300 कोटी रुपयांचा आहे. 14,000 कोटींची वार्षिक उलाढाल असून सर्वसामान्यांना केंद्रस्थानी मानून त्यांचे कर्ज प्रकरण मंजूर केले जाते. यावर्षीचे खरीप पीक कर्ज 973 कोटींचे वाटप झाले. रब्बी पीक कर्ज वाटप बाकी आहे. विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमन, संचालक व सभासदांनी कार्यक्षम व प्रभावीपणे कर्ज वाटप व वसुली केल्यासच जिल्हा बॅंकेचा विकास होणार आहे.

बॅंक संचालक बाळासाहेब नेवाळे म्हणाले की, मावळ तालुक्‍यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचा दि. 12 ते 30 सप्टेंबर दौरा काढण्यात येणार असून सचिवांनी 50 टक्के कर्जदार सभासद उपस्थित करावे. यापूर्वी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेला कार्यालये नव्हती ती दोन वर्षांपासून करण्यात आली दर महिन्याला सचिवांनी बैठका घेणे आवश्‍यक असून त्या बैठका कागदोपत्री नकोत. या बैठकीला चेअरमन, संचालक सचिव व सभासदांनी उपस्थित राहून संस्थेच्या पारदर्शी, शिस्तबद्ध व प्रभावीपणे कारभाराची माहिती घ्यावी. नोटा बंदी व कर्जमाफीमुळे बॅंकेच्या कर्जवाटप व वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. तोट्यात असलेल्या संस्थांना मदत करण्याचा विचार जिल्हा बॅंक करत असून संचालक मंडळानी कर्ज वाटप व वसुलीवर भर द्यावा.

प्रास्ताविक बॅंक उपाध्यक्षा अर्चना घारे यांनी केले. सूत्रसंचालन विशेष वसुली अधिकारी गणेश साबळे यांनी केले. राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक संघ तालुकाध्यक्ष छबुराव कडू यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)