“पीओपी’चा पुनर्वापर शक्‍य!

पुणे विद्यापीठाच्या संशोधकांचा शोध : कचऱ्याची समस्या सुटणार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – “प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) पुनर्वापराचे तंत्रज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास “पीओपी’च्या प्रचंड प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवणे जवळच्या काळात शक्‍य होणार असल्याची चिन्हे आहेत.

-Ads-

“पीओपी’चा वापर करून घडविण्यात येणाऱ्या विविध कलाकृती व सजावट हा सर्वांच्याच औत्सुक्‍याचा विषय असतो. मात्र, “पीओपी’ पुन्हा वापरता येत नसल्याने त्याचा कचरा आणि त्यापासून होणारे प्रदूषणही प्रचंड आहे. या समस्येवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील सायन्स पार्क विभागाने तोडगा काढला आहे. या प्रणालीनुसार “पीओपी’ भाजणे, दळणे, चाळणे अशा सोप्या प्रक्रिया विशिष्ट प्रकारे केल्या, तर त्यापासून पुन्हा एकदा “पीओपी’च्या मूर्ती वा अन्य कलाकृती बनवता येणे शक्‍य आहे, अशी माहिती या प्रयोगाचे संचालक व विद्यापीठामधील प्राध्यापक डॉ. जयंत गाडगीळ यांनी दिली. गाडगीळ यांच्या समवेत या प्रकल्पामध्ये त्यांच्या सहकारी सोनाली म्हस्के या देखील कार्यरत आहेत. सायन्स पार्क विभागाकडून या संदर्भात गेल्या वर्षी प्रयोगा दाखल एक टन “पीओपी’वर प्रक्रिया करण्यात आली. त्यापासून 800 किलो “पीओपी’ पुन्हा मिळविण्यात यश आले.

“पीओपी’चा घरगुती सजावट, भव्य सेट्‌सची उभारणी आणि मूर्ती तयार करणे यांच्याशी अगदी जवळचाच संबंध आहे. सजावटीसाठी दररोज हजारो टन “पीओपी’ वापरला जातो. याशिवाय फक्‍त पुण्यातच “पीओपी’पासून बनविण्यात आलेल्या किमान 6 लाख मूर्तींचे गेल्या वर्षी विसर्जन झाले. “पीओपी’च्या या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे विसर्जनानंतर त्यांचे काय व कसे व्यवस्थापन करायचे, ही समस्या दरवर्षी अधिकाधिक कठीण होते. कारण “पीओपी’ किंवा त्याच्या भुकटीचा पुन्हा वापर करता येत नाही, असे आतापर्यंत मानण्यात आले होते. हीच बाब सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या “पीओपी’लाही लागू पडते. या पार्श्वभूमीवर, सायन्स पार्ककडून करण्यात आलेले हे संशोधन उल्लेखनीय आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये….
* “पीओपी’चा पुनर्वापर शक्‍य असल्यामुळे त्याचा पर्यावरणावरील ताण कमी होतो.
* मूर्ती विसर्जनामुळे होणारे प्रदूषण टळते.
*”पीओपी’चे नक्षीकाम, रंगकामापूर्वी भिंती लिंपणे, अन्य सजावटीसाठी वापर करता येतो.

“पीओपी’ पुनर्वापर प्रकल्प फक्‍त प्रायोगिक पातळीवर न राहता प्रत्यक्षातील समस्या सोडविण्यासाठी राबविण्यात यावा. या प्रकल्पासाठी आता आम्हाला पाठबळ देऊ शकणाऱ्या संस्था, गणेशमंडळे, स्वयंसेवी संस्थांचा शोध घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे; तसेच या प्रक्रियेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत.
– डॉ. जयंत गाडगीळ, प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)