पीएमपी स्थानकातील शौचालयाला टाळे

आळंदी- तीर्थक्षेत्र आळंदी येथे पीएमपी बस स्थानकावर इंटरनॅशनल सुलभ व तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुलभ शौचालयांची उभारणी करण्यात आली. मात्र, महिला प्रवशांसाठी असलेल्या शौचालयाला गेल्या तीन महिन्यांपासून टाळे असल्याने महिला प्रवाशांची मोठी कुंचबणा होत आहे. तर पुरुषांकरीता असलेले शौचालय नावालाच सुरू आहे. या ठिकाणी नाक मुठीत धरूनच जावे लागते, तचेच कचरा, दारुच्या बाटल्यांचे साम्राज्य, विजेचा अभाव त्यामुळे असली “शौचालये नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
आळंदीत तसे पाहिले तर एसटी महामंडळाच्या बसेस नावालाच येतात, त्यामुळे भाविकांना पुण्यात उतरुन एक तर पीएमपीने किंवा खासगी वाहनाद्वारेच आळंदीत यावे लागते. त्यातच पुण्याच्या मुख्य ठिकाणांहून पीएमपीच्या बसेस आळंदीत सोडल्या जातात त्यामुळे भाविक पीएमपीलाच पसंती देतात. मात्र, आळंदीतील पीएमपी स्थानकात शौचालयाचा अभाव असल्याने भाविकांसह पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यात महिलांचे शौचालयास टाळे असल्याने महिलांची मोठी कुंचबणा होते तर पुरुषांच्या स्वच्छतागृहात अस्वच्छतेचे साम्रज्य असूनही नाईलाजास्तव या शौचालयाचा वापर करीत आहेत. याबाबत पीएमपी स्थानकाच्या अधिकाऱ्यांसह अनेकांनी शौचालया विषयी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करुन देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने प्रशासन झोपले आहे का? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

  •  स्वच्छ भारत भिंतीच्या पलिकडे अस्वच्छता
    आळंदीतील पीएमपीच्या शौचालयाच्या भिंतीवर स्वच्छ सर्वेक्षण (2018)च्या आणाभाका घेणारी बोलकी वाक्‍य लिहिण्यात आली असून या भिंतीच्या पलिकडे पाहिल्यास खरंच “स्वच्छ भारत’ मिशनचे स्वप्न पूर्ण होणार का असा सवाल प्रवशांना पडला आहे.
  • ठेकेदार म्हणतो की…
    काय करणार येथे पाणी, वीज नाही तर शौचालयाची कशी देखभाल करणार असे सांगून ठेकेदाराने वेळ निभाऊन जरी नेली असली तरी ठेका घेण्याच्या पहिले त्याला ही परिस्थिती माहित नव्हती का? आणि जर माहित होती तर मग ठेका घेतलाच कसा हा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
  • वस्तुस्थिती जरी खरी असली तरी या शौचालयांची मुदत संपली असल्याने येत्या महिन्याभरात त्याठिकाणी नवीन शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे.
    – समीर भूमकर, मुख्याधिकारी, नगर पालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)