पीएमपी प्रवाशांवर तिकीट दरवाढीची कुऱ्हाड?

वरिष्ठ पातळीवर हालचाली : इंधन दरवाढीने अर्थकारण कोलमडले

पुणे- इंधन दरवाढीचा फटका पुणे महानगर परिवहन महामंडळाला बसत आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचे गणित गेल्या काही महिन्यांपासून बिघडले आहे. तोटाही सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाने तिकीट दरवाढीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे इंधनदरवाढीचा फटका थेट प्रवाशांना बसण्याची शक्‍यता आहे.

या संभाव्य दरवाढीसाठी प्रशासनाने राज्यातील काही प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या तिकिट दरांचा अभ्यास केला आहे. या आधारावर येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्‍यता प्रशासकीय सूत्रांनी वर्तविली आहे. त्यातच, पंधरा दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि नागपूर शहर बससेवेच्या तिकिटात वाढ करण्यात आली आहे. त्याचा आधार घेत ही दरवाढीची मागणी केली जाण्याचीही शक्‍यता आहे.

इतर शहरांचा यापूर्वीच अभ्यास
गेल्या काही महिन्यांपासून इंधनदरात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे पीएमपीवर आर्थिक बोजा वाढत आहे. त्यासाठी तिकीट दरवाढीसंदर्भात काही महिन्यांपूर्वीच नियोजन सुरू करण्यात आले असून इतर जिल्ह्यांतील तिकीटदराचा अभ्यास करण्यात आला आहे. यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि बंगळुरू येथील तिकीट दरांचा विचार करण्यात आला होता.

संचालक मंडळ राजी होणार का?
गेल्या काही दिवसांपासून डीझेल, सीएनजी दरांत झालेल्या वाढीमुळे अधिकाऱ्यांमध्ये तिकीट दरवाढीची चर्चा केली जात आहे. मात्र, संचालक मंडळ यासाठी राजी नसल्याचे चित्र आहे. यामुळे येत्या बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव मांडला, तरी संचालक मंडळाची भूमिका यामध्ये निर्णायक ठरणार आहे. लोकसभा निवडणूका तोंडावर असल्याने त्याचा फटका संचालक मंडळ ताब्यात असलेल्या भाजपला बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे संचालक मंडळाच्या निर्णयावरच ही दरवाढ अवलंबून असणार आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने डिझेलदरात होणाऱ्या वाढीमुळे पीएमपीला मोठा फटका बसत आहे. पीएमपीच्या ताफ्यात 800 पेक्षा जास्त बसेस या डिझेवरील आहेत. यासाठी रोज 38 हजार डिझेल खरेदी करावे लागते. मात्र, सातत्याने दरात वाढ होत असुन एकट्या सप्टेबरमध्ये 6 रुपये 25 पेशांनी वाढ झाली आहे. यामुळे याचा अतिरीक्त ताण प्रशासनावर पडत आहे. यातच भर म्हणून गेल्या तीन दिवसापुर्वी सीएनजी दरातही 3 रुपये प्रतिकिलो वाढ करण्यात आली आहे. पीएमपीच्या ताफ्यात 1224 बसेस सीएनजीवरील असुन यासाठी रोज 62 हजार किलोग्रॅम सीएनजी लागते. यात किलोमागे तीन रुपये वाढल्याने रोजचा 1 लाख 86 हजाराचा फटका बसत आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यात पीएमपीचे कंबरडे मोडले असुन भाववाढीचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्‍यता आहे.
———————–


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)