पीएमपी ताफ्यात नव्या बसेस कधी?

ब्रेकडाऊनही वाढले : जनसंवाद कार्यक्रमात सवाल

पुणे – लोकसंख्येच्या तुलनेत बसेसची संख्या कमी आहे. गेल्या दहा वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात नव्या बसेस आल्या नाहीत. काही महिन्यांपूर्वी 200 मिडीबस खरेदी करण्यात आल्या. मात्र, जुन्या बसेसमधील बहूतांश बसेसची आयुमर्यादा संपली असल्याने ब्रेकडाऊनचे प्रमाण जास्त आहे. यामुळे सातत्याने बसेस बंद पडत आहेत. काही महिन्यांपासून नव्या बसेसबाबत नुसतीच घोषणा केली जात असून प्रत्यक्षात नव्या बसेस कधी दाखल होणार? असा सवाल पीएमपी जनसंवाद कार्यक्रमादरम्यान उपस्थित करण्यात आला.

पंडित नेहरू सांस्कृतिक भवन येथे “जनसंवाद : पीएमपीसाठी एक पाऊल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे, वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते, पीएमपी सहव्यवस्थापक अजय चारठणकर, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे पालिकेचे प्रकल्प अधिकारी श्रीनिवास बोनाला आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी अनेक प्रश्‍न मांडले. बस वेळेवर न येणे, खराब बसेस मार्गावर आणणे, नादुरुस्त आयटीएमएस प्रणाली, मिडी बसेसच्या समस्या, “बीआरटी’ बसेसची समस्या, ब्रेकडाऊन, खराब बसस्थानक, हेल्पलाइन आदी समस्यांचे पाढे नागरिकांनी वाचले.

लोकसंख्येच्या तुलनेत साडेतीन हजार बसेसची गरज पीएमपीकडे मात्र 2 हजार 33 बसेस आहेत. नव्या बसेसची घोषणा केली जाते. प्रत्यक्षात त्या दाखल होत नाहीत. यावर टेंडर प्रक्रिया अंतिम टप्यात असून नव्या वर्षात काही बसेस दाखल होणार असल्याचे नयना गुंडे म्हणाल्या.

‘दया, कुछ तो गडबड है’
सर्व मार्गावरील पीएमपी बसेस तुडूंब भरुन जातात. काही मार्गांवर तर बसण्यासाठी जागाही नसते. मात्र, तरीदेखील पीएमपी तोट्यात कशी? असा सवाल उपस्थित करत प्रशासनातच “दया, कुछ तो गडबड है’ असा डायलॉग मारताच सभागृहामध्ये हशा पिकला. दरम्यान, उत्पन्न वाढीसाठी कामचुकारांवर कारवाई, जुन्या बसेसची देखभाल-दुरुस्ती, व्यावसायिक इमारत, जाहिरातीतून उत्पन्न मिळवता येऊ शकते, असे एका नागरिकाने म्हटले.

कामचुकारवर कारवाई करा
पीएमपी बससेवा सातत्याने तोट्यात जात आहे. अल्पउत्पन्न, बसेस बंद पडणे, बसस्टॉपवर बस न थांबवणे आदी कारणांसाठी काही प्रमाणात कामचुकार कर्मचारीही जबाबदार असल्याचा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर कामचुकारांवर कारवाई करण्याच्या सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे यांना केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)