पीएमपी चालकांनो, इंधन वाचवा

चालकांना धडे : पीसीआरएतील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण

गणेश राख
पुणे, दि. 7 – डीझेल दरांत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या पीएमपी प्रशासनाने आता इंधनबचतीवर लक्ष दिले आहे. ताफ्यातील प्रत्येक चालकाला प्रात्यक्षिक, माहितीपुस्तक, प्रत्यक्ष माहितीद्वारे इंधबचतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च ऍन्ड ऍनालिसिस (पीसीआरए) संस्थेतील तज्ज्ञांच्या मदतीने चालकाला “इको फ्रेन्डली ड्रायव्हिंग’चे धडे देण्यात येत आहेत.

पीएमपीच्या ताफ्यात एकूण 2 हजार 93 बसेस आहेत. यातील निम्म्याहून अधिक बसेस 5 ते 6 वर्षांपेक्षा जुन्या आहेत. यामुळे तुलनेने जास्त इंधन लागते. गेल्या पाच महिन्यांत पीएमपीला मिळणारे डीझेल तब्बल 10 रुपये प्रतिलिटरने वाढले आहे. यामुळे व्यवस्थापनावर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. या पार्श्‍वभूमीवर पीएमपीने आता ताफ्यातील प्रत्येक चालकाला प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे.

यासाठी मुख्य कार्यालयात मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार, शनिवार या दोन टप्प्यांत प्रशिक्षण दिले जात आहे. “पीपीटी’च्या माध्यमातून माहिती, पुस्तिका, तसेच प्रत्यक्ष बस चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक डेपोतील चालकाला दोन दिवस कामावर न पाठवता प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येत आहे.

हे केल्यास इंधनबचत शक्‍य
– ब्रेकचा कमीत-कमी वापर
– गाडी जास्तीत जास्त वेळा गिअरवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न
– टायरमधील हवा वेळोवेळी तपासून नियंत्रित ठेवणे.
– लिकेज, छोट्या गळतीवर लक्ष देणे
– क्‍लचवर पाय न ठेवता गाडी चालवणे
– सिग्नलला गाडी बंद करणे
– स्टॅन्डमध्ये प्रवेश केल्याबरोबर स्विच बंद करणे
– बसचा वेग लक्षात घेऊन गिअर बदलत राहणे
– पुढील थांबा माहित असल्यास, अर्जंट ब्रेक न लावता अंदाज घेऊन ऍक्‍सिलेटर कमी करणे
– ट्रॅफिकच्या स्पीडप्रमाणे बस चालवणे

प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष ड्रायव्हिंग
“पीसीआरए’ संस्थेतील तज्ज्ञांच्या मदतीने लेक्‍चर, प्रात्यक्षिक दाखवून ड्रायव्हरला इंधनबचतीचे धडे दिले जातात. यानंतर दिलेल्या प्रशिक्षणाचा वापर करण्यासाठी स्वारगेट-कात्रज मार्गावर “ट्रायल’ घेतली जात आहे. त्यावेळी ड्रायव्हरमागे बसून तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करत आहेत.

बसेसच्या मेन्टेनन्सवरही लक्ष
इंधनबचतीसाठी बसचे मेन्टेंनन्स महत्त्वाचे आहे. त्यामुळे इंजिनिअर्सनाही प्रशिक्षण देण्यात येत असून बसच्या छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष देण्याचे सांगण्यात येत आहे. ब्रेक, क्‍लच दुरुस्ती वेळोवेळी करणे. बस सुस्थितीत ठेवण्याबद्दल माहिती दिली जात आहे.

जुन्या बसेसचा भरणा
पीएमपी ताफ्यात जुन्या बसेसची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांचे “ब्रेकडाऊन’ अधिक आहे. अशा काही बसेस या सातत्याने दुरुस्त कराव्या लागत आहेत.

चालकाने विशिष्ट नियम पाळल्यास इंधनबचत शक्‍य आहे. यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असून बसचे वेळोवेळी मेन्टेंनन्स गरजेचे आहे. बस चालवताना टाळता येण्यासारख्या काही गोष्टी आहेत. यात आवश्‍यक बदल केल्यास इंधनात जवळपास 10 टक्के बचत होऊ शकते.
– बी. एस. राजे, “पीसीआरए’, तज्ज्ञ

डीझेलदरवाढीचा मोठा फटका बसत असून इंधनबचतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. आता चालकांना इंधनबचतीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामाध्यमातून प्रत्येक ड्रायव्हरला प्रशिक्षण देण्यात येईल.
– नयना गुंडे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

तज्ज्ञ म्हणतात,
10% इंधनबचत शक्‍य

एकूण ड्रायव्हरर्स
2 हजार 890


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)