पीएमपीला संचलन तूट दिल्याने महापौर नाराज

PMPML, Pune

पिंपरी- संचलन तुटीपोटी पीएमपीएमएलला 15 कोटी, 84 लाख 85 हजार 851 रुपये देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. ही रक्कम दोन समान हप्त्यांमध्ये अदा केली जाणार आहे. पीएमपीच्याच एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले असताना, पीएमपीचे विलगीकरण करण्याचे निवेदन महापौर राहुल जाधव यांनी त्यांना दिले होते. त्यानंतर स्थायीने संचलन तुटीचा विषय मंजूर केल्याने त्यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

पीएमपीएमएलमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा 40 टक्के हिस्सा असतानादेखील लोकप्रतिनिधींच्या मागणीचा सन्मान न राखणे, विविध मार्गांवर पुरेशा प्रमाणात बस न सोडणे, पूर्वाश्रमीच्या पीसीएमटी कर्मचाऱ्यांना सापत्नभावाची वागणूक देणे, पिंपरी कार्यालय सुरू करण्यात चाल-ढकल केल्याचा आरोप करत पीएमपीएमएलचे विलगीकरण करून पुन्हा स्वतंत्र पीसीएमटी सुरू करण्याची मागणी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याशिवाय महासभेत पीएमपीला आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव देखील मागे घेण्याची कार्यवाही करण्याचा मानस त्यांनी व्यक्‍त केला आहे.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या साप्ताहिक विषय पत्रिकेवर एकूण 204 कोटी 62 लाखांच्या संचलन तुटीचे अवलोकन करण्याचा विषय होता. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महापालिका हिश्‍याचे 81 कोटी 84 लाख, 85 हजार 851 रुपये पीएमपीला देणे आहे. त्यापैकी आतापर्यंत संचलन तुटीपोटी 66 कोटी रुपये दिले असून, उर्वरित 15 कोटी, 84 लाख, 85 हजार 851 रुपये अदा करण्याचा प्रस्ताव स्थायीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. ही रक्कम दोन समान हफ्त्यांमध्ये अदा करण्यास स्थायीने मान्यता दिली आहे.

महापौर राहुल जाधव हे पीएमपीएमएलच्या कारभारावर नाराज असून, पुन्हा पीसीएमटी सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र स्थायी समितीच्या प्रस्तावाची त्यांना माहिती नसल्याने हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे समजताच त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)