पीएमपीमुळे वाहतुकीचे चार तास “ब्रेक डाऊन’

पिंपरी – रविवारच्या सुट्टीमुळे दिवाळीच्या खरेदीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या आनंदावर पीएमपीने अक्षरशः विरजण घातले. पिंपरी मुख्य बाजारपेठेतील सर्वाधिक वर्दळीच्या शगुन चौकात पीएमपीची एक बस बंद पडली. तिच्यामुळे मागून येणाऱ्या दहा बस अडकल्या. पुढे-मागे होता येत नसल्याने या बसेसह खासगी वाहनेही या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या. त्यामुळे तब्बल चार तास वाहतूक ठप्प झाली होती.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या “पीएमपी’ला “ब्रेकडाऊन’च्या समस्येने ग्रासले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) कडून दुजाभाव करत जुनाट बस पाठविल्या जात असल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडकरांकडून होत आहे. वारंवार होणाऱ्या बसेसच्या “ब्रेक डाऊन’मुळे या आरोपाला पुष्टी मिळत आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी आजही असाच संतापजनक प्रकार घडला. दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ऐन दिवाळीच्या सणात बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता आज पिंपरी बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. शगुन चौकात मनाई असताना उभी केली जाणारी वाहने तसेच विक्रेत्यांचे अतिक्रमण यामुळे सकाळपासून शगुन चौकातून वाहतूक संथगतीने सुरू होती. त्यातच निगडी आगाराची बस घरकुलच्या दिशेने मार्गस्थ होत असलेली बस (एमएच 14 सीडब्लू 1815) शगुन चौकात अचानक बंद पडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एक वाहन पुढे सरकू शकेल अशा जागेत अडकलेल्या या बसमुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांची लांब लचक रांग लागली. या रांगेत पीएमपीच्याच दहा बस अडकून पडल्या. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षा दुचाकीमुळे वाहतुकीचा बोऱ्या वाजला. बंद पडलेल्या बस चालक व वाहकावर इतरांनी तोंडसुख घेतले. बसमधील प्रवाशांनाही नाहक मनःस्ताप सहन करावा लागला. ही वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली. दरम्यान, चालक व वाहकांनी वरिष्ठांना अनेक वेळा फोन केला. मात्र, त्यांची कोणीही दखल घेतली नाही. सुमारे चार तास हा गोंधळ सुरु होता. हॉर्न, वाहन चालकांचा संताप यामुळे बाजारपेठेचे पुर्ण वातावरणच बदलून गेले. मोठ्या उत्साहाने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या आनंदावर यामुळे विरजण पडले. अखेर पोलिसांनी बंद पडलेली बस हटवल्यावर वाहतूक सुरळीत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)