“पीएमपी’त बदल्यांचा धडाका!

दांडीबहाद्दरांना दिलासा : एका दिवसात 342 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पिंपरी – आठवडाभरापूर्वी 158 बदली चालकांची सेवा संपुष्टात आणल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला “पीएमपीएमएल’च्या एकूण 342 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये 212 चालक व अन्य 130 हेल्पर, स्वीपर, क्‍लिनर, बॉडी फिटर अशा विविध संवर्गातील पदांचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यात सेवेतील अनियमिततेमुळे “पीएमपीएमएल’च्या 158 चालकांना प्रशासनाने घरचा रस्ता दाखविला आहे. त्यापाठोपाठ कारवाई झालेल्या 150 दांडीबहाद्दर वाहकांचीदेखील यादी प्रसिद्ध होणार असल्याच्या चर्चेने वाहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या दोन दिवसांत अशी कोणतीही यादी प्रसिद्ध न झाल्याने या वाहकांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला असला, तरीदेखील त्यांच्यावर अद्यापही कारवाईची टांगती तलवार आहे.

प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने या बदल्या करण्यात येत असल्याचे “पीमएपीएमएल’ प्रशासनाने काढलेल्या बदली आदेशात नमूद केले आहे. त्याअंतर्गत पुणे व पिंपर-चिंचवड शहरातील सर्व 13 आगारांचा आढावा घेण्यात आला असून, पात्र ठरणाऱ्या सर्व चालकांच्या बदल्या केल्या आहेत. नुकत्याच केलेल्या चालकांच्या बदलीने हे चालक मात्र पुरते चक्रावले आहेत. या सर्व चालकांचे डेपो बदलले आहेत. राहत्या घरापासून भौगोलिकदृष्टया दूर अंतरावर केलेल्या बदल्यांना या चालकांचा विरोध आहे. मात्र, कोणतीही कामगार संघटना “पीएमपीएमएल’ प्रशासनाला याबद्दल जाब विचारू शकत नसल्याने बदलीच्याठिकाणी रुजू होण्याखेरीज या चालकांना पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. या बदल्या अन्यायकारक असल्याची चर्चा चालकांमध्ये आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी…
कोणत्याही मार्गावर काम करायचे आहे ही आमची मानसिकता आहे. मात्र, किमान घरापासून कामाचे ठिकाण कमी अंतरावर असावे, अशी माफक अपेक्षा आहे. मात्र, या बदल्या करताना याचा विचार झाला नसल्याची खंत संबंधित चालकांनी व्यक्‍त केली आहे. बदलीच्या नव्या ठिकाणी रुजू झाल्यास कामाच्या तासांव्यतिरिक्‍त किमान दोन ते चार तास बदलीच्या ठिकाणी पोचण्यास खर्च होणार आहेत. त्याचा कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असे या चालकांचे म्हणणे आहे. मात्र, थोडा त्रास सहन करुन बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास या चालकांनी प्राधान्य दिले आहे.

काम वाटपाने तपासणीस हैराण…
गेली काही दिवसांपासून “पीएमपीएमएल’च्या पिंपरी मुख्यालयातून तिकीट तपासणीसांना वाटप केल्या जाणाऱ्या कामाचे नियोजन स्वारगेट मुख्यालयातून केले जात आहे. त्यामुळे दिवसभरात कोणत्या मार्गावर तिकीट तपासणीसाठी जायचे आहे, याची माहिती घेण्यासाठी शहरातील सर्व तिकीट तपासणीसांना मुख्यालयात जावे लागत आहे. त्यामुळे ये-जा करण्यासाठी खर्च होणारा वेळ आणि कामाचे तास याचे नियोजन करताना त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)