पीएमपीचे 5 कर्मचारी तडकाफडकी निलंबित

– प्रवाशांशी गैरवर्तन आणि उद्धटपणे व्यवहार भोवला

पुणे (प्रतिनिधी) – गैरवर्तन करणारे तीन चालक आणि दोन वाहकांना पीएमपी प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच आगामी काळात गैरवर्तन करणाऱ्या आणि प्रवाशांशी उध्दटपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशाच पध्दतीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे इतर कर्मचाऱ्यांत मात्र धडकी भरली आहे.
वाहक बाळासाहेब काटे यांनी पाच प्रवाशांकडून प्रवासी भाडे घेऊन त्यांना तिकीट न देता 195 रुपयांचा अपहार केला होता. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या खिशामध्ये पाच हजार रुपये आढळून आले होते. सुरेश ननावरे यांनी दोन महिला प्रवाशांकडून संपूर्ण प्रवासाचे भाडे आकारुन त्यांना निम्म्या पैशांचे तिकिट दिले होते. साहेबराव कांबळे यांनी वेळेपूर्वी बस मार्गस्थ करुन प्रवाशांची गैरसोय केली, तसेच महामंडळाचे आर्थिक नुकसान केले. संदीप रणदिवे या बदली वाहकाने बसचा रुटबोर्ड खाली पाडून बस पंक्‍चर असल्याची खोटी माहिती दिली. नरेंद्र भाट याने ड्युटीवर असताना मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. अशोक घुले या चालकाने बस वेगात चालवून त्याच्या बसच्या पुढे जात असलेल्या एका दुचाकीस्वारास बसच्या पुढच्या डाव्या बाजूची धडक बसून हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. विनोद सोंडेकर या बदली वाहकाने प्रवाशाकडून साठ रुपये घेतले. मात्र, त्यांना तिकीट दिले नाही. चंद्रकांत गर्जे या वाहकाने पाच प्रवाशांकडून पावणेदोनशे रुपये घेऊनही त्यांना त्या मार्गाचे तिकिट दिले नाही. आदी कारणांसाठी या पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. आगामी काळातही गैरवर्तन करणाऱ्या वाहक आणि चालकांच्या विरोधात अशा पध्दतीने कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पीएमपी प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)