पीएमपीची सेवा ब्रेकडाऊन

कंत्राटी चालक-वाहकांवर आगारातील अधिकाऱ्यांचा दबाव

पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवणारी पीएमपीएमएल सध्या ब्रेकडाऊनच्या गंभीर समस्येने ग्रासली आहे. शनिवारी (दि. 1) पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील नेहरूनगर रस्त्यावर एकामागे एक दोन बस बेकडाऊन झाल्या. तर गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समोरच बीआरटीच्या मार्गात बस ब्रेकडाऊन झाल्याने एकामागे एक अशा सहा बस थांबल्याने पीएमपीचा कारभार सर्व शहरवासियांनी बघितला. सततच्या ब्रेकडाऊनच्या समस्येकडे पीएमपी प्रशासनाचे सतत दुर्लक्ष होत असल्यामुळे पीएमपी बसचे ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण कमी होण्या ऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे.

नेहरुनगर आगारात गेल्या चार महिन्यांपासून जवळपास निम्या बस नादुरुस्त असल्याने आगारातच धूळखात उभ्या आहेत. परिस्थिती सुधारण्याऐवजी ती आणखीनच बिकट होताना दिसत आहे. आगारातील चालक व वाहक नादुरुस्त गाड्यांमुळे कमालीचे हैराण झाले असून त्यांना नादुरुस्त गाड्या रस्त्यावर काढण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात आहे. त्यामुळे पीएमपी बस रस्त्यावर गेल्या की लगेच ब्रेकडाऊन होत असल्याचे चालक-वाहक सांगतात. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहून दुसऱ्या वाहनाची प्रतिक्षा करण्याची वेळ येते आहे. पिंपरी येथील नेहरुनगर आगारात तशा पीएमपीच्या मालकीच्या आणि भाड्याच्या गाड्या मिळून 160 पर्यंत आकडा जात असला तरी प्रत्यक्षात निम्म्याच गाड्या रस्त्यावर धावत आहेत. त्यातही ब्रेकडाऊनचा आकडा वाढतच असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. परिणामी कंत्राटी चालक आणि वाहकांना दिवसभर आगारात बसून संध्याकाळी विनापगार घरी परत जावे लागत असल्याची कैफियत देनिक प्रभातने यापूर्वी मांडली होती. पीएमपी प्रशासन बस दुरुस्त करण्याऐवजी चालक वाहकांनाच जास्त दमदाटी करत असल्याचे काही चालक-वाहकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

कंत्राटी चालक-वाहकांना खुलेआम दमदाटी
नेहरुनगर आगारातील चालक-वाहक आपल्या समस्या प्रभातच्या प्रतिनिधीला सांगत असताना ड्युटी किपर असलेल्या विक्रम जाधव यांनी त्यांच्यावर दमदाटी करायला सुरुवात केली. काही माहिती सांगाल तर परिणाम वाईट होतील, असे जोरजोरात बोलत होते. यावरुन नेहरुनगर आगारात परिस्थिती किती भयंकर आहे याचा अंदाज येतो. बस दुरुस्तीकडे लक्ष न देता दमदाटी देण्यावर येथील अधिकाऱ्यांचा जास्त कल असल्याचे येथील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)